पुणे-मुंबई दरम्यान वेगवान प्रवासासाठी द्रुतगती मार्ग बांधला खरा, पण आता त्यावर वेगवान भरवसा राहिलेला नाही. गेल्या काही दिवसांमध्ये झालेली वाहतुकीची कोंडी आणि त्याचा सोसावा लागलेला त्रास यामुळे प्रवाशांना कित्येक तास अडकून पडावे लागते. त्याला इतर अनेक कारणे आहेत, पण प्रमुख म्हणजे खंडाळ्याजवळ बोरघाटात असलेला अमृतांजल पुलाजवळचा परिसर!
या परिसरात असलेल्या अनेक अडथळ्यांमुळे अनेकदा तेथे अपघात होतात आणि वाहतुकीचा खोळंबा होतो. गेल्या काही दिवसांमध्ये असे तीन प्रसंग घडले. त्यामुळे कितीतरी तास वाहतूक ठप्प
१) खंडाळा ते खोपोली हा बोरघाटाचा परिसर आहे. तेथूनच हा रस्ता काढण्यात आला आहे. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर बोरघाटात नेहमीच अपघात व्हायचे आणि वाहतूक ठप्प व्हायची. २००२ साली द्रुतगती महामार्गाची निर्मिती केली, तरी काही तांत्रिक अडचणींमुळे खंडाळा ते खोपोली हा घाटमाथ्याचा, चढ-उतार व वळणांचा भाग पुन्हा एकत्र करण्यात आल्याने दहा किमी अंतरामध्ये द्रुतगती महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग एकच आहे. या परिसरात वाहनांची संख्या सर्वाधिक असते.
२) या परिसरात घाटाची तीव्र चढण-उतार असल्याने खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाचा परिसर द्रुतगती महामार्गाला कासवगती बनवत आहे. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाताना तीव्र उतार असल्यामुळे वाहने उलटून अपघात होण्याचे प्रकार सर्रास घडतात. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना तुंगार्ली गाव ते खोपोली दरम्यान पूर्ण उतार आहे.
३) यामध्ये खंडाळा बोगदा ते खोपोली येथील फुडमॉलपर्यंतचा रस्ता वळणावळणाचा व उताराचा असल्याने या भागात वाहनांचे ब्रेक निकामी होणे, चालकाचा गाडीवरील ताबा सुटणे, वेगात असलेले वाहन वळणावर कलंडणे-उलटणे, पुढील वाहनांवर जाऊन धडकणे हे प्रकार सातत्याने घडतात.
४) शिवाय अमृतांजन पुलाजवळचा रस्ता पुढे अरुंद आहे. त्यामुळेही अपघातात भर पडते. अनेक वेळा वाहने पुलाच्या कठडय़ाला धडकतात किंवा पूल ओलांडल्यानंतरच्या तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटतो.
५) काही अवजड वाहनांचे चालक इंधन वाचवण्यासाठी या उतारावर बहुतांश वेळा गाडय़ा न्युट्रल करून जातात, यामुळे गाडीवरील ताबा सुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढते.
६) अवघड वळणे, खडी चढण यामुळे गाडीचे इंजिन व टायर गरम होऊन वाहने बंद पडण्याची शक्यता असते.
गरम होऊन गाडय़ा बंद पडणे, इंजिन व बॅटरीच्या भागात जास्त उष्णता निर्माण झाल्याने पेट घेणे असे प्रकार पाहायला मिळाले आहेत.
एकदा का असा प्रकार घडला, की तेथे वाहतुकीची कोंडी होण्यास वेळ लागत नाही. व्यस्त वाहतुकीचा काळ असेल, तर थोडय़ाच वेळात लांबच्या लांब रांगा लागतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा