पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत असून गेल्या अकरा महिन्यांत या मार्गावर एक हजार ७६७ अपघात झाले आहेत. त्यामध्ये ६३ जणांचा मृत्यू झाला असून २८७ जण गंभीर, ७५८ व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत. अपघातात मृत्यू होण्याच्या आकडय़ामध्ये या वर्षी थोडी वाढ झाली आहे. या मार्गावर होणाऱ्या अपघातापैकी ८० हे मानवी चुकांमुळेच होत असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. अतिवेगामुळे मोटारींचे टायर फुटल्याने मोटारी उलटणे, अतिवेगात चालकांला डुलकी लागल्यामुळे मोटारीवरील ताबा सुटणे, बंद पडलेल्या वाहनांना जाऊन धडकणे अशी या अपघातांच्या मागील कारणे असल्याचे समोर आले आहे.
मुंबई व पुणे या दोन शहरांमधील अंतर कमी व्हावे आणि गतिमानतेसोबत नागरिकांचा प्रवास सुरक्षित व्हावा, याकरिता २००२ साली द्रुतगती महामार्ग सुरू करण्यात आला. या मार्गावर साधारण तासाला ८० किलोमीटार एवढी वेगमर्यादा दिली असताना चालकांकडून सरासरी १०० ते १४० च्या वेगाने मोटारी चालवण्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षी द्रुतगती मार्गावर एकूण पाच हजार ३५६ अपघात झाले होते. यामध्ये किरकोळ अपघात जास्त होते. तर ५२ जणांचा मृत्यू तर एक हजार ६७ जण जखमी झाले होते. यापकी २६८ गंभीर जखमी होते. या वर्षी एकूण अपघात आणि त्यामध्ये मृत्यूचा आकडा वाढला आहे. गेल्या बारा वर्षांचा विचार करता या मार्गावर एकूण लहान मोठे असे सुमारे २० हजारांच्या जवळ अपघात झाले आहेत. यामध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागले असून हजारो प्रवासी जायबंदी झालेले आहेत. रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनी यांनी केलेल्या अपघातांच्या सव्र्हे अनुसार सुमारे ८० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे झाल्याचे आढळून आले आहेत. मात्र, हे अपघात रोखण्याकरिता कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना केलेली दिसत नाही. वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून कोठेही स्पीडगन लावलेली दिसत नाही. त्याबरोबरच लेनची शिस्त न पाळणाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही.
वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब
उस्रे टोलनाक ते खंडाळा घाट हा या मार्गावरील अपघाती परिसर बनला आहे. खंडाळा घाटात अवजड वाहने बंद पडून निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही नित्याची बाब बनली आहे. मात्र, त्यावर रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीकडून चांगला तोडगा काढण्यात अपयश आले आहे. या ठिकाणी वाहने बंद पडल्यामुळे अनेक तास वाहतूक कोंडी झाल्याची उदाहरणे आहे. ही वाहने काढण्यासाठी घाटात अद्ययावत क्रेन घाटात उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अकरा महिन्यांत १७६७ अपघात
अपघातात मृत्यू होण्याच्या आकडय़ामध्ये या वर्षी थोडी वाढ झाली आहे. या मार्गावर होणाऱ्या अपघातापैकी ८० हे मानवी चुकांमुळेच होत असल्याचे पाहणीत आढळून आले आहे.
First published on: 13-12-2014 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expressway accident death human mistake