पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर आणि विरोधी पक्षनेते विनोद नढे यांची शुक्रवारी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाया आणि पक्षशिस्त भंग ही कारणे देऊन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे.
भोईर हे काँग्रेसचे जुने पदाधिकारी असून नढे त्यांचे समर्थक आहेत. गेल्या काही दिवसांपासून आजी-माजी शहराध्यक्षांमध्ये पक्षांतर्गत वाद सुरू आहेत. शहराध्यक्ष सचिन साठे यांना भोईर समर्थक नगरसेवकांकडून सहकार्य केले जात नव्हते. नगरसेवक कैलास कदम यांची पुन्हा गटनेतेपदी निवड झाल्यानंतर वाद आणखी वाढले. भोईर व नढे यांच्याकडून होत असलेल्या पक्षविरोधी कारवाया साठेंनी माणिकरावांच्या निदर्शनास आणून दिल्या, त्यानंतर ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येते. प्रदेश काँग्रेसचे चिटणीस अभिजित देशमुख यांनी याबाबतचे पत्र पाठवले आहे.
भोईर काँग्रेस सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या हालचालीतून उघड झाले होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी भोईरांची खास जवळीक असल्याने त्यांच्यावर नेहमीच टीका होत होती. काँग्रेसमधून बाहेर पडून समर्थक नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती, त्या आधीच ही कारवाई झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expulsion of bhoir and nadhe from congress