पुणे : पक्ष विरोधी कृत्य, संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावरील टीका आणि पक्षाच ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करून स्वाभिमानी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आली. पक्षाच्या शिस्त पालन समितीचे अध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील यांनी सोमवारी पुण्यात ही घोषणा केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्त पालन समितीची बैठक सोमवारी पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ज्येष्ठ नेते सतीष काकडे, विठ्ठल मोरे, मिलिंद साखरपे, अनिल पवार आदींसह जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत तुपकर यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. यापुढे तुपकर यांचा स्वाभिमानी पक्ष आणि संघटनेशी कोणताही संबंध असणार नाही, असेही पाटील यांनी जाहीर केले.

हेही वाचा >>>पिंपरी : धक्कादायक ! गर्भपात करताना प्रेयसीचा मृत्यू झाल्यावर मृतदेह इंद्रायणीत फेकला; तिच्या दोन मुलांनाही नदीत टाकले

जालिंदर पाटील म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तुपकर यांना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद दिले. संघटनेच्या वतीने राज्यमंत्री पदाच्या दर्जाचे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष पद दिले. तरीही तुपकर संघटनेच्या विरोधात काम करीत राहिले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुपकर यांनी २६ सप्टेंबर २०१९ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजीनामा दिला होता. त्यानंतरही तुपकर यांच्या मागणीनंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात सक्रिय होते. लोकसभा निवडणूक तुपकर यांनी पक्षाच्या वतीने लढविणे अपेक्षित होते, तरीही ते अपक्ष म्हणून लढले. तरीही स्वाभिमानीचा एक कार्यकर्ते म्हणून शेट्टी यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतरही तुपकर यांनी शेट्टी यांच्यावर टीका करणे सुरूच ठेवले होते. ते मागील तीन ऊस परिषदेसह अन्य कोणत्याही कार्यक्रमला उपस्थिती राहिले नाहीत. तुपकर सातत्याने पक्ष विरोधी कृत्ये करीत आहेत. शेट्टी यांच्या विरोधात वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे शिस्त पालन समितीसमोर उपस्थितीत राहून आपले म्हणणे मांडण्याची नोटीस काढली होती. पण, ते शिस्त पालन समितीसमोर हजर राहिले नाहीत. त्यांनी परस्पर विधानसभेला विदर्भातील सहा जागा लढविण्याची घोषणा केली.

‘आता ते स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे पक्ष आणि संघटनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे. यापुढे तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही, असे जालिंदर पाटील यांनी स्पष्ट केले.