पुणे : राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी हजारो पात्रताधारक प्रतीक्षेत आहेत. मात्र, पवित्र संकेतस्थळावर भरतीच्या पदांसाठीच्या जाहिराती देण्यास मुदतवाढ देण्यात आल्याचे जाहीर केले असून, आता व्यवस्थापनांना २८ फेब्रुवारीपर्यंत जाहिराती देता येणार आहेत.

राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील भरतीमध्ये निवड झालेल्या सुमारे १८ हजार उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील रिक्त पदे, खासगी अनुदानित शाळांतील रिक्त पदांवर भरती होणार आहे. त्याशिवाय, पहिल्या टप्प्यातील रिक्त पदांचा समावेश दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत केला जाणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात किती पदे उपलब्ध होणार, याकडे राज्यभरातील पात्रताधारकांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर, दुसऱ्या टप्प्यातील भरतीसाठी शिक्षण विभागातर्फे जाहिराती देण्यासाठी २० जानेवारी ते २० फेब्रुवारीची मुदत देण्यात आली होती.

शिक्षण विभागाने पवित्र संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील १ हजार २०१६ व्यवस्थापन आणि विविध माध्यमांसाठी एकूण १३३७ जाहिरातींची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, बऱ्याच व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांनी त्यांच्या अखत्यारितील शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र संकेतस्थळावर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी काही अडचणी आल्यास edupavitra2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Story img Loader