लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मिळकतकरातील ४० टक्क्यांची सवलत घेण्यासाठीच्या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. योजनेची मुदत १५ नोव्हेंबर रोजी संपणार असल्याने ३० नोव्हेंबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश येत्या गुरुवारी काढण्यात येणार आहेत.

शहरातील निवासी मिळकतींना वर्षानुवर्षे मिळणारी ४० टक्क्यांची सवलत १ एप्रिल २०२३ पासून रद्द करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले होते. त्यामुळे ही सवलत कायम ठेवावी, असा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाला पाठविण्यात आला होता. त्याला मंत्रिमंडळाने आणि त्यानंतर विधानसभेच्या अधिवेशनातही मंजुरी मिळाली होती.

आणखी वाचा-धूळ नियंत्रणासाठी पुणे महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय, अति रहदारीच्या चौकात उभरणार कारंजे

सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात काहीसा विलंब झाल्याने यंदा मिळकतकराची नियमित देयके देण्यासही उशीर झाला होता. तसेच ज्या तीन लाखांहून अधिक मिळकतधारकांची ही सवलत रद्द करण्यात आली आहे, त्यांनी क्षेत्रीय कार्यालयाकडे अर्ज करावा, असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी १५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र या कालावधीत ७० हजार मिळकतधारकांनी महापालिकेकडे अर्ज केले होते. मिळकतधारकांची उदासीनता आणि दिवाळीची सुटी यामुळे मिळकतकर सवलत योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्था, माजी नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार पंधरा दिवसांनी मुदत वाढविण्यात आली आहे.

मिळकतकरातील ४० टक्क्यांची सवलत कायम करण्यासाठी महापालिकेकडून अर्ज मागविण्यात आले होते. ही मुदत १५ नोव्हेंबर रोजी संपणार असल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. मिळकतधारकांना ३० नोव्हेंबर पर्यंत सवलतीसाठी अर्ज करता येणार आहे. त्याबाबतचे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून काढण्यात येतील. -अजित देशमुख, उपायुक्त, कर आकारणी आणि कर संकलन विभाग, पुणे महापालिका

Story img Loader