पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता २९ ऑगस्टपर्यंत प्रवेशाची संधी मिळणार असून, यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पुण्यात सरींवर सरी

हेही वाचा – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या १३३ जागांवर भरती, अर्ज प्रक्रिया कधीपासून?

प्रवेश प्रक्रियेत सोमवारी रात्रीपर्यंत ६१ हजार १५७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला होता. त्यामुळे ४४ हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा राज्यातील ९ हजार २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २४२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी दाखल झालेल्या २ लाख ४२ हजार ५१६ अर्जांतून ९३ हजार ९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रतीक्षा यादीत ७१ हजार २७६ विद्यार्थ्यांचा समावेश होता. सुरुवातीला २३ ते ३१ जुलै या कालावधीत प्रवेशासाठी संधी दिल्यानंतर आणखी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रतीक्षा यादीतील २३ हजार ८५० विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २६ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत २९ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extension of deadline for rte admissions how many seats are still vacant pune print news ccp 14 ssb