पिंपरी : महापालिकेचा समाज विकास विभाग आणि ‘लाइट हाऊस कम्युनिटीज’ यांंच्या सहकार्याने शहरातील बेरोजगार तरुण आणि तरुणींना व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लाइट हाऊस’ केंद्रांना पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वीच्या कराराची मुदत संपत असल्याने निविदा प्रक्रियेविना १२ केंद्रांना महापालिका आयुक्तांनी पाच वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे.
या उपक्रमांतर्गत आतापर्यंत दोन हजार ९१७ युवक आणि युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याचा दावा महापालिकेच्या समाज विकास विभागाने केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील १८ ते ३० वयोगटातील तरुण व तरुणींना मोफत कौशल्यविकास व रोजगार प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी महापालिकेने शहरात बारा लाइट हाऊस केंद्र सुरू केले आहेत. हा उपक्रम लाइट हाऊस कम्युनिटीज् संस्थेच्या सहकार्याने राबविला जात आहे. महापालिका या केंद्रांसाठी जागा, इमारत, कार्यालय, तसेच पाणी व वीज उपलब्ध करून देते. ती संस्था तरुणांची निवड करून त्यांना मोफत प्रशिक्षण देते. तसेच, खासगी कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध करून दिली जाते.
या संदर्भात महापालिका व लाइट हाऊस कम्युनिटीज् संस्थेमध्ये १५ सप्टेंबर २०२० ला करारनामा करण्यात आला. या उपक्रमाची मुदत पाच वर्षे होती. ती १४ सप्टेंबर २०२५ ला संपत आहे. नवीन करारनामा करण्याबाबत संस्थेने समाज विकास विभागाकडे विनंती केली. ती मान्य करून पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.
शहरात बारा केंद्रे
पिंपरीतील सावित्रीबाई फुले स्मारक, निगडीतील ठाकरे मैदानाशेजारी, चिंचवडगावातील झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालय, भोसरीतील गव्हाणेवस्ती येथील बहुउद्देशीय सभागृह, बोऱ्हाडेवाडीतील महादू रस्ते प्राथमिक शाळा, बोपखेलमधील बहुउद्देशीय सभागृह, नेहरूनगरामधील क क्षेत्रीय कार्यालय, दापोडीतील वाहनतळ इमारत, किवळेतील विकासनगर येथील विभागीय कार्यालय, आकुर्डीतील गंगानगर येथील पांडुरंग काळभोर व्यापारी संकुल, चिखलीतील पाटीलनगर येथील जुनी महापालिका शाळा आणि वाकडमधील काळा खडक येथील इमारत येथे ही बारा केंद्रे सुरू आहेत.