महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या अतिरिक्त कलागुण प्रस्तावांसाठी मुदतवाढ देण्यात आली. आता विद्यार्थ्यांना शाळेकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी २३ जानेवारी, तर शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे.
हेही वाचा- नाराज कार्यकर्त्यांना संधी ! पुण्यात दहा स्वीकृत नगरसेवक होणार
राज्य मंडळाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावीच्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला, चित्रकला आणि लोककलांतील प्राविण्यासाठी सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येतात. विद्यार्थ्यांना कलागुण प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ जानेवारीची मुदत देण्यात आली होती. मात्र कला संचालनालयाकडून एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल १६ जानेवारीला जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे शास्त्रीय कला, चित्रकला आणि लोककलांसाठी कलागुण प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. या गुणांच्या सवलतीपासून विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबत मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.