लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीतील प्रवेशांसाठी सोमवारपर्यंत (२६ जून) मुदतवाढ देण्यात आली आहे. रविवार सायंकाळपर्यंत केंद्रीभूत प्रवेश (कॅप) आणि राखीव जागांअंतर्गत एकूण २६ हजार ५४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले.
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा ३२४ महाविद्यालयांत ८८ हजार ४१३ केंद्रीभूत प्रवेशासाठी, तर २४ हजार ९७७ कोटा प्रवेशासाठी अशा एकूण १ लाख १३ हजार ३९० जागा उपलब्ध आहेत. २१ जूनला पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यात एकूण ४२ हजार २३९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यातील २३ हजार ३५१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय जाहीर झाले होते.
आणखी वाचा-गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा परिषदेकडून आता डिजिटल प्रमाणपत्रे, गुणपत्रके
प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करण्यासाठी २४ जूनची मुदत देण्यात आली होती. मात्र पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि काही कनिष्ठ महाविद्यालये यांनी केलेल्या मागणीनुसार प्रवेशांसाठी सोमवारी (२६ जून) सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची सूचना अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.