पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शिक्षण विभागाने फेब्रुवारीमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलांमुळे न्यायालयीन प्रकरण उद्भवले होते. शिक्षण विभागाने केलेला बदल न्यायालयाने घटनाबाह्य ठरवला. त्यामुळे शिक्षण विभागाला पूर्वीप्रमाणेच आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवावी लागत आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुमारे दोन महिने चालल्याने यंदा प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे.
हेही वाचा – पिंपरी : हद्द झाली! मृत जनावरांच्या दहनातही गैरव्यवहार
हेही वाचा – Pune Crime Review : शहरबात : पुण्यात कधीही काहीही घडू शकते…
यंदा राज्यातील ९ हजार २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २४२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी दाखल झालेल्या २ लाख ४२ हजार ५१६ अर्जांतून ९३ हजार ९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रतीक्षा यादीत ७१ हजार २७६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २३ ते ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. ही मुदत बुधवारी संपली. या मुदतीत ३९ हजार ४०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. मात्र प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ मिळाल्यामुळे अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे.
© The Indian Express (P) Ltd