पुणे : कोथरूड येथे उभारण्यात येत असलेल्या शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे बाह्य बांधकाम पूर्ण झाले आहे. याच्या उर्वरित कामासाठी २३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाकडे पाठविला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसिद्ध कवी गीतकार गदिमा यांचे स्मारक उभारण्याचा विषय ४० वर्षांहून अधिक काळ रखडला होता. माडगूळकर कुटुंबीयांनी महापालिका प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर कोथरूड येथील महात्मा सोसायटीजवळील सर्व्हे नंबर ६९-७० ही जागा स्मारकासाठी निश्चित करण्यात आली आहे. या भागातील ६.२७ एकर जागेवर या स्मारकासह कोथरूड प्रदर्शन केंद्र उभारण्यात येत आहे, तर गदिमा स्मारकाचे बांधकाम एकूण ९ हजार ३९३.३२ चौरस मीटरचे आहे. या स्मारकाचे बाह्य बांधकाम पूर्ण झाले असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. याच्या उर्वरित कामासाठी राज्य सरकारने २३ कोटी रुपयांचा निधी द्यावा, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आयुक्त भोसले यांनी दिली.

हे ही वाचा…दहावी बारावी शिष्यवृत्तीसाठी महापालिकेकडे आले ‘ इतके ‘ अर्ज

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड भागात साकारण्यात येत असलेल्या गदिमा स्मारकाची गेल्या आठवड्यात पाहणी केली होती. पालिका आयुक्त राजेंद्र भोसले या वेळी उपस्थित होते. या वेळी स्मारकाचे उर्वरित काम मार्गी लावण्यासाठी निधी मिळावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवा, मी त्याचा पाठपुरावा करीन, अशी सूचना पाटील यांनी पालिकेला केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या स्मारकाचे बाह्य काम पूर्ण करण्यासाठी साडेचार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

हे ही वाचा…कोथरुडमध्ये गुंगीचे ओैषध देऊन ज्येष्ठ महिलेची लूट

या कामांनाही मिळाली मान्यता

महात्मा फुले मंडईच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेने सव्वा कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. यात प्रामुख्याने अतिक्रमणे हटविणे, गळक्या शेड्सची दुरुस्ती, पन्हाळी बसविणे ही कामे केली जाणार आहेत. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ७५ कोटी रुपयांच्या खर्चाला तर समाविष्ट २३ गावांमधील सांडपाणी व्यवस्थेसाठी २० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देखील देण्यात आली आहे, असेही आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: External construction of shabtabrabhu madgulkars memorial is completed in kothrud pune print news ccm 82 sud 02