पुणे विद्यापीठातील बहि:स्थ अभ्यासक्रम पदवीस्तरापर्यंतच ठेवण्याचा प्रस्ताव विद्यापीठाच्या विचाराधीन असून येत्या व्यवस्थापन परिषदेमध्ये त्याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे. मात्र, बहि:स्थ अभ्यासक्रमाची नियमावली अजूनही निश्चत न झाल्यामुळे प्रवेश प्रक्रिया यावर्षी लांबणीवर पडली आहे.
विद्यापीठातील नियमित विद्यार्थ्यांपेक्षाही बहि:स्थ विद्यार्थ्यांच्या वाढणाऱ्या संख्येवर आळा घालण्यासाठी बारावी किंवा पदवीनंतर बहि:स्थ पद्धतीने पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तीन वर्षांचे अंतर ठेवण्याची अट घालण्याचा प्रस्ताव विद्यापीठ प्रशासनापुढे ठेवण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावाबाबत समाजातील आणि शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांमधून विरोध झाला. त्या पाश्र्वभूमीवर बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत पुनर्विचार करण्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने समितीची नेमणूक केली आहे. या समितीने आता विद्यापीठ प्रशासनाला दोन वेगवेगळे पर्याय सुचवले आहेत. पदव्युत्तर स्तरावरील बहि:स्थ अभ्यासक्रम बंद करण्यात यावेत किंवा बहि:स्थ पद्धतीने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच बहि:स्थ पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात यावेत, असे पर्याय समितीने सुचवले असल्याचे सूत्रांनी सांगितले. या वर्षीपासून पदव्युत्तर स्तरासाठी क्रेडिट सिस्टिम राबवण्यात येणार आहे. मात्र, बहि:स्थ अभ्यासक्रमामध्ये ही पद्धती राबवणे शक्य नसल्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रम बंद करण्याचा प्रस्ताव दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
महाविद्यालयांची नियमित प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर विद्यापीठाच्या बहि:स्थ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. मात्र, यावर्षी अजूनही बहि:स्थ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. बहि:स्थ पद्धतीने प्रवेश देण्यासाठी नियमावली अजूनही तयार झाली नसल्यामुळे बहि:स्थ अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा