सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात या वर्षीही दूरशिक्षण सुरू करण्यासाठी मुहूर्त मिळालेला नसून त्यामुळे या वर्षीही बहि:स्थ अभ्यासक्रम सुरूही ठेवता येत नाही आणि बंदही करता येत नाही अशा परिस्थितीत रेटावा लागणार आहे. बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग घेण्याची विद्यापीठाची घोषणा या वर्षी तरी प्रत्यक्षात येणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गेली काही वर्षे नियमित अभ्यासक्रमांपेक्षा बहि:स्थ अभ्यासक्रमांनाच होणारी गर्दी आणि त्याच वेळी या अभ्यासक्रमांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. त्यामुळे दूरशिक्षण सुरू करण्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर गेली दोन वर्षे विद्यापीठात दूरशिक्षण अभ्यासक्रमाची नुसतीच चर्चा आहे. गेल्या वर्षी व्यवस्थापन परिषदेने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार या वर्षीपासून विद्यापीठात दूरशिक्षण सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, दूरशिक्षणाबाबत केंद्राच्या धोरणामध्येच अस्थिरता होती. सुरुवातीला ‘डिस्टन्स एज्युकेशन काउन्सिल’कडे दूरस्थ शिक्षणाबाबत निर्णय घेण्याचे आणि निकष ठरवण्याचे अधिकार होते. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाकडे दूरस्थ शिक्षणाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले. या सगळ्या गोंधळामध्ये पुणे विद्यापाठाचा दूरशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव अद्यापही मंजूर झालाच नाही. त्यामुळे या वर्षीही बहि:स्थ अभ्यासक्रम सुरू ठेवण्याशिवाय विद्यापीठाला पर्याय राहिला नाही.
सर्व अभ्यासक्रमांसाठी केंद्राने श्रेयांक पद्धत राबवण्याची सूचना विद्यापीठांना केली आहे. मात्र, बहि:स्थ अभ्यासक्रम करणारे विद्यार्थ्यांना श्रेयांक पद्धत अवलंबता येत नाही. गुणवत्ता राखण्यासाठी बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयाचे मार्गदर्शन वर्ग घेण्याचेही विद्यापीठाने जाहीर केले होते. मात्र, यातील काहीच प्रत्यक्षात उतरले नाही. या वर्षीही बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन घेण्याची तयारी विद्यापीठाने सुरू केली आहे. सध्या दूरशिक्षणासाठी तयार करण्यात आलेले अभ्याससाहित्य बहि:स्थ पद्धतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे बहि:स्थ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही वर्षांतील काही मार्गदर्शन वर्गाना हजर राहणे आवश्यक असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा