डेक्कन जिमखाना भागातील एका प्रसिद्ध उपाहारगृहातील जेवणाची थाळी घरपोहोच देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी दोघांना पाच लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येरवडा आणि कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गु्न्हे दाखल झाले आहेत.
याबाबत कोरेगाव पार्क भागातील एका नागरिकाने चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व्यावसायिक आहेत. त्याच्या पत्नीने डेक्कन जिमखाना भागातील एका प्रसिद्ध उपाहारगृहाची जाहिरात समाजमाध्यमावर पाहिली होती. त्यांच्या पत्नीने जाहिरातीतील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. चोरट्यांनी घरपोहोच थाळी पाेहचवतो, असे सांगितले. त्याने चोरट्याने त्यांना जोहो नावाचे एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. या ॲपमध्ये चोरट्याने त्यांना क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती भरण्यास सांगितले.
हेही वाचा >>> ‘पीएफआय’बरोबरील रद्द करारावरून राजकारण; पुण्यात भाजप, राष्ट्रवादी यांची परस्परांवर टीका
त्यानंतर चोरट्याने या माहितीचा गैरवापर करुन तक्रारदाराच्या बँक खात्यातून एक लाख ५२ हजार ३२१ रुपये लांबविले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ तपास करत आहेत.दरम्यान, येरवडा भागातील एकाची अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी गोपीनाथ अर्जुन मारंडी (रा. ओदिशा) आणि साक्षीकुमारी विष्णूदेव प्रसाद (रा. बिहार) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. डेक्कन जिमखाना भागातील एका प्रसिद्ध उपाहारगृहातील थाळी घरपोहोच देण्यात येईल, अशी बतावणी केली होती. त्यानंतर चोरट्यांनी तक्रारदाराच्या क्रेडीट कार्डची माहिती घेतली. जोहो ॲप डाऊनलोड करुन त्यावर बँक तसेच क्रेडीट कार्डची माहिती भरण्यास सांगितले. चोरट्यांनी तक्रारदाराच्या बँक खात्यातून तीन लाख ३४ हजार ९३ रुपये लांबविले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे तपास करत आहेत.