दिवाळीसाठी प्रवाशांची मागणी लक्षात घेता एसटीकडून सोडण्यात येणाऱ्या जादा गाडय़ांची सुविधा सुरू करण्यात आली आहे. एसटीच्या शहरातील स्थानकांबरोबरच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर व मार्केट यार्ड भागामध्ये एसटीचे तात्पुरते स्थानकही सुरू करण्यात आले असून, त्या ठिकाणाहून बुधवारपासून जादा गाडय़ा सोडण्यात सुरुवात करण्यात आली.
एसटीच्या वतीने यंदा दिवाळीसाठी स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्थानक व िपपरी-चिंचवड स्थानकातून दोन हजारांहून अधिक जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. स्वारगेट स्थानकावर दिवाळीच्या कालावधीत येणारा ताण व या परिसरामध्ये होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता तेथून सोडण्यात येणाऱ्या काही जादा गाडय़ा पर्यायी स्थानकातून सोडण्यासाठी मार्केट यार्ड परिसरात तात्पुरते स्थानक उभारण्यात आले आहे. मार्केट यार्डमध्ये गुरांच्या बाजाराजवळ हे स्थानक उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव ज्ञानेश्वर आदमाने यांच्या हस्ते झाले. एसटीचे विभाग नियंत्रक अशोक जाधव, स्वारगेटचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक विजयकुमार दिवटे त्या वेळी उपस्थित होते. या ठिकाणाहून सोडण्यात आलेल्या स्वारगेट-राधानगरी या पहिल्या बसचे प्रवासी शरद व पूजा अडमुठे यांच्या हस्ते गाडीची पूजा करून सुविधेला प्रारंभ करण्यात आला.
तात्पुरत्या दोन्ही स्थानकामध्ये मोबाइल टॉयलेट, रुग्णवाहिका, पिण्याचे पाणी आदींची सुविधा करण्यात आली आहे. मार्केट यार्ड परिसरातील स्थानकातून पुढील चार दिवसांत ४९५ जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी ठिकाणी या स्थानकातून बस सोडल्या जातील. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरून सुमारे ९०० जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. विदर्भ, मराठवाडा, लातूर, उस्मानाबाद, नांदेड आदी भागामध्ये या ठिकाणाहून गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.
जादा गाडय़ांचे आरक्षण सुरू करण्यात आले असून, गाडय़ांच्या अधिक माहितीसाठी स्वारगेट (२४४४८७९४), शिवाजीनगर (२५५३६९७०), पुणे स्टेशन (२६१२६२१८), िपपरी-चिंचवड (२७४२०३००), डेक्कन जिमखाना (२५४२१६९४) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader