युवक महोत्सव आणि पर्यावरण महोत्सव या दोन महोत्सवांच्या नावाखाली महापालिकेच्या तिजोरीची लूट झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या महोत्सवांच्या नावाखाली अठ्ठेचाळीस लाख रुपयांची उधळपट्टी झाल्याचे स्पष्ट झाले असून तीन दिवसांचे हे महोत्सव ठेकेदारांनी संगनमत करून गुपचूप उरकल्याचीही वस्तुस्थिती समोर आली आहे.
महापालिकेकडून प्रायोजित केल्या जाणाऱ्या महोत्सवांना स्वयंसेवी संस्थांकडून जोरदार विरोध झाल्यामुळे आता महापालिकेकडूनच विविध महोत्सव आयोजित केले जाऊ लागले आहेत. त्यानुसार २४ ते २६ मार्च दरम्यान ‘युवक-करिअर’ महोत्सव आणि ‘पर्यावरण; महोत्सव असे दोन महोत्सव आयोजित करण्यात आले होते. मात्र, ऐन परीक्षांच्या काळातच हे महोत्सव आयोजित करण्यात आल्यामुळे त्यांना अत्यल्प देखील प्रतिसाद मिळाला नाही. पैशांची मात्र मोठी उधळपट्टी झाली.
या दोन्ही महोत्सवांची कामे ज्या ठेकेदारांनी मिळवली, ते एकाच पत्त्यावरील, एकाच घरातील असून त्यांनी ही कामे परस्परात वाटून घेतली आहेत. महोत्सवासाठी दोघांच्याच निविदा येऊनही कायद्यानुसार फेरनिविदा न काढता त्यातील एकाला काम देण्यात आले. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने हे आणि असे अनेक गैरप्रकार या महोत्सवांसाठी झाल्याची तक्रार विजय कुंभार, मंगेश तेंडुलकर, विवेक वेलणकर, सूर्यकांत पाठक, संदीप खर्डेकर, विश्वास सहस्त्रबुद्धे आणि जुगल राठी यांनी आयुक्तांकडे केली आहे.
करिअर महोत्सवात वक्त्यांच्या मानधनासाठी तब्बल सव्वाचार लाख रुपये खर्च दाखवण्यात आला असून एवढे मानधन घेणारे वक्ते कोण आहेत, त्याची माहिती पुणेकरांना मिळाली पाहिजे, अशीही मागणी करण्यात आली आहे. यापूर्वीही महोत्सवांच्या नावाखाली महापालिकेला लुटणारे या महोत्सवात मागील दाराने मिरवत होते, याकडेही आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले आहे. या महोत्सवांसंबंधीची कागदपत्रे एवढी स्पष्ट आहेत की उधळपट्टी आणि निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे सिद्ध करण्याची गरजच नाही. त्यामुळे दोषी संस्था, व्यक्ती आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशीही मागणी स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.

पर्यावरण महोत्सव खर्च २३ लाख ४० हजार!

– पर्यावरण टॅगलर्स लावणे- एक लाख रुपये
– वॉर्मिग ग्लोबिंग, व्याख्यान- ७५ हजार रुपये
– पर्यावरण डॉक्युमेंटरी- पावणेतीन लाख
– स्पर्धकांचा चहा, नाश्ता- दीड लाख
– हार, शाली, गुच्छ, मंडप- पावणेदोन लाख

करिअर महोत्सव खर्च- २३ लाख ७४ हजार
– शिबिर, दोन चहा, एक नाश्ता- प्रत्येकी ३०० रुपये
– तज्ज्ञांची व्याख्याने, मानधन- एक लाख रुपये
– तीस स्टॉल उभारणे- तीन लाख रुपये
– वक्तृत्त्व स्पर्धा- दोन लाख रुपये
– शाळा, महाविद्यालयात व्याख्याने- अडीच लाख