पुणे : राज्यात ऑगस्ट महिन्यात आलेली डोळे येण्याची साथ आता ओसरली आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात असलेली सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आता शून्यावर आली आहे. तसेच राज्यात अकोला वगळता इतर जिल्ह्यांत डोळ्याच्या साथीचा एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. जुलैच्या सुरुवातीपासून राज्यात डोळे येण्याच्या साथीचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सप्टेंबर सुरू झाल्यापासून रुग्णसंख्या ओसरू लागली आहे.
राज्यात ९ सप्टेंबरला केवळ ९ रुग्ण आढळले असून, हे सर्व जण अकोला जिल्ह्यातील आहेत. पुणे जिल्हा, पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत एकही रुग्ण आढळला नाही. तसेच मुंबईतही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही. राज्यात यंदा ९ सप्टेंबरपर्यंत डोळे येण्याच्या साथीत एकूण ५ लाख ५० हजार ४४२ रुग्ण आढळले. त्यात सर्वाधिक ५२ हजार ५२३ रुग्ण पुणे जिल्ह्यात, त्याखालोखाल बुलढाणा जिल्ह्यामध्ये ४९ हजार ८९३ रुग्ण आढळले. जळगाव जिल्ह्यात २९ हजार ८५६, चंद्रपूर २५ हजार ५६४, अमरावती २३ हजार २८०, परभणी २२ हजार ५९२ आणि नांदेड २२ हजार १९६ रुग्ण आढळले.
हेही वाचा : तुळशीबाग गणपती आता जाणार सातासमुद्रापार,जर्मनीमधील महाराष्ट्र मंडळात होणार प्रतिष्ठापना
‘सप्टेंबरच्या सुरुवातीपासून डोळ्यांच्या साथीचे रुग्ण कमी होत आहेत. डोळ्याची साथ ओसरल्याचे हे चिन्ह आहे. राज्यभरात केवळ नऊ नवीन रुग्ण आढळले आहेत’, असे आरोग्यसेवा विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी सांगितले.