इंदापूर : इंदापूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा व त्यांचे पती मुकुंद शहा व  इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा या शहा  कुटुंबायांच्या आगामी राजकीय भूमिकेकडे इंदापूर तालुक्याचे लक्ष वेधले आहे. मागील काळात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पासून  शहा कुटुंब बाजूला गेले होते.लोकसभा निवडणुकीपुर्वी शहा कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला . त्यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी ही प्रवेश केला.लोकसभा निवडणुकीमध्ये इंदापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यातून पंचवीस हजार मताधिक्य मिळाले होते. हे मताधिक्य मिळवून देण्यात जगदाळे व शहा कुटुंबाचा मोठा वाटा मानला जात होता .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मताधिक्याच्या जोरावर शहा कुटुंबाने जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्याचे माजी सभापती व सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांना एकत्र करत विधानसभा निवडणुकीची मोठी रणनीती आखली होती. मात्र,मागील विधानसभा निवडणुकीमध्ये ऐनवेळी हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षातून शरदचंद्र पवार पक्षात आल्याने शहा कुटुंबाची  मोठी पंचायत झाली. शरद पवार यांनी शहा कुटुंबियांच्या घरी हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत जाऊन सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.  मात्र त्यात श्री.पवार  यांना यश आले नव्हते.

या दरम्यानच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शहा कुटुंबाची भेट घेतली होती. परंतु विधानसभा निवडणुकीत शहा कुटुंबियांनी पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने यांना बरोबर घेऊन इंदापुरात परिवर्तन विकास आघाडीची स्थापना केली होती. या आघाडीचे मेळावे होऊन निवडणूक लढवण्याची निश्चित झाले. मात्र ऐनवेळी आघाडीत फूट पडली.प्रवीण माने यांनी विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात जाऊन त्यांनी विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे  यांना पाठिंबा दिला.

सोनाई समूहाचे प्रमुख दशरथ माने यांचे पुत्र पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे माजी सभापती प्रवीण माने यांनी स्वतः आपला उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी कायम ठेवली होती .या परिवर्तन विकास आघाडी  फूट पडल्यामुळे शहा कुटुंबाने शांततेची भूमिका घेतली होती .प्रवीण माने यांनी बंडखोरी कायम ठेवून ‘अकेला चलो रे’ चा नारा कायम ठेवला.

ऐनवेळी परिवर्तन विकास आघाडीत फूट पडल्यामुळे या आघाडीचे तीनही प्रमुख नेते तीन वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यामुळे लोकांमध्ये फार मोठा संभ्रम निर्माण झाला. तरीही प्रवीण माने यांनी सुमारे ३९ हजार मताधिक्य मिळवून आपले अस्तित्व दाखवून दिले. शहा कुटुंबाने शांत भूमिका घेतली असली तरी इंदापूर तालुक्यात ही वादळापूर्वीची शांतता मानली जात आहे.

आता आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद व इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माजी नगराध्यक्षा अंकिता शहा , मुकुंद शहा व भरत शहा हे बंधु कोणती राजकीय भूमिका घेणार?  याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. इंदापूर शहर व ग्रामीण भागामध्ये शहा कुटुंबांना माणणारा एक वेगळा वर्ग असून मुकुंद शहा यांचे वडील दिवंगत गोकुळदास शहा हे कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक व्हाईस चेअरमन होते . दिवंगत माजी खासदार शंकरराव पाटील यांचे विश्वासू सहकारी होते.

पुढील प्रदीर्घकाळ शहा कुटुंबातला एक व्यक्ती  कारखान्यावर कायम राहिली. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळामध्ये शहा कुटुंबाचे मोठे योगदान मानले जाते. याच संस्थेच्या सचिव पदावरून मुकुंद शहा यांना पायउतार व्हावे लागल्याने शहा कुटुंब नाराज झाले होते. या नाराजीतूनच शहा कुटुंबियांनी हर्षवर्धन पाटील यांच्याशी असलेला राजकीय सलोखा संपुष्टात आणला.इंदापूर शहर व तालुक्यात शहा कुटुंबाला माणणारा मोठा वर्ग असल्याने शहा कुटुंब आता कोणती राजकीय भूमिका घेणार याकडे इंदापूर शहरासह इंदापूर तालुक्याचे लक्ष वेधले आहे.