राज्यातील ठाकरे सरकार आपली दोन वर्ष पूर्ण करत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारच्या कामगिरीबाबत आज(शनिवार) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असती, त्यावर फडणवीस यांनी अगदी थोडक्यात प्रतिक्रिया दिली.

ठाकरे सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत, त्यांच्या कामगिरीकडे तुम्ही कशापद्धतीने पाहता? या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “नेमकी सरकारची कामगिरीच काय आहे की ज्यावर मी बोलू. जिथे कामगिरी असते तिथे मूल्यमापन केलं जातं. कामगिरीच नाही सरकारची त्यामुळे मूल्यमपान करण्याचा प्रश्नच येत नाही.” तसेच, “मला आनंद आहे की आजही राज्यातील नंबर १ चा पक्ष हा भाजपाच आहे.” असंही फडणवीस यांनी यावेळी बोलून दाखवलं.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबीयांची पुण्यातील पर्वती येथील घरी जाऊन आज भेट घेतली.

एक जागतिक दर्जाची शिवसृष्टी ही तयार झाली पाहिजे –

पुरंदरे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, त्यांची सेवा करत करत प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि विशेषता युवकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आणि आता ते निघून गेल्यानंतर, त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं की अतिशय उत्तम प्रकारची शिवसृष्टी तयार झाली पाहिजे. ते त्यांनी हाती घेतलेलं काम हे अपूर्ण आहे, हे कोणा एका व्यक्तीचं काम नाही, यासाठी संपूर्ण समाजाला उभं राहावं लागेल. आम्ही लोक आपल्यापरीने ही शिवसृष्टी पूर्ण करण्याकरिता जी काही आमच्यापरीने मदत करता येईल, ती निश्चितपणे करू. पण मला असं वाटतं की तमाम शिवप्रेमींचं हे स्वप्न आहे आणि ही जबाबदारी देखील आहे की, एक जागतिक दर्जाची शिवसृष्टी ही तयार झाली पाहिजे.”

उदयनराजे भोसले यांनी अशी मागणी केलेली होती की, केंद्र आणि राज्य सरकारने मिळून या शिवसृष्टीसाठी आर्थिक मदत करणे गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही काय पाठपुरवा करणार आहात का? यावर फडणवीस म्हणाले, “जेव्हा आमचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही, त्या शिवसृष्टीला एक दर्जा दिलेलाच आहे. त्यामुळे आता केंद्राला किंवा राज्याला विशेषता मदत करायची असेल तर त्यात कुठली अडचण नाही. मला असं वाटतं की त्याला मदत करण्यास कुणाची ना देखील नसेल, त्यामुळे जरूर त्यांची मदत देखील आपण घेऊयात.”

दिल्लीत माझी कुठलीही राजकीय भेट नव्हती –

याचबरोबर, “काल दिल्लीत माझी कुठलीही राजकीय भेट नव्हती. आम्ही दिल्लीत गेलो की आमच्या नेत्यांबरोबर जाऊन चर्चा करत असतो. राज्यात काय सुरू आहे याबाबत माहिती त्यांना देतो. काल मुख्य उद्देश हा संघटनात्मक बैठकीचा होता. चंद्रकांत पाटील आणि मी आम्ही दिल्ली संघटनात्मक बैठकीला गेलो होतो. जवळपास तीन-चार तास आमची संघटनात्मक बैठक होती.” असंही फडणवीस यांनी कालच्या दिल्ली दौऱ्याबाबत माहिती दिली.

Story img Loader