शहराचा वाढता विस्तार लक्षात घेत पुणे शहराचे विभाजन करून दोन महापालिका करण्याची आवश्यकता आहे, या चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी फेटाळून आली. शहराचे विभाजन होणार, हा नवा वाद कशाला, जेंव्हाचे तेंव्हा पाहू. सध्या सरकारकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा >>> पुण्याचे पालकमंत्री होणार का ? देवेंद्र फडणवीस म्हणाले…
शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येचा विचार करता पुण्याचे विभाजन करून दोन महापालिकांची आवश्यकता आहे, अशी भूमिका राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडली होती. दोन महापालिकांबाबत पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेतल्याने निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाली होती.
हेही वाचा >>> पुणे : वर्गणीच्या वादातून बांधकाम व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार ; तरुण अटकेत
वाढत्या विस्ताराने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दोन महापालिका करण्याची माझी भूमिका राजकीय नाही. मात्र कामकाजाच्या दृष्टीने सुलभता यावी, यासाठी हा निर्णय आवश्यक आहे. दोन महापालिका झाल्यास समस्या तातडीने सुटतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा केली असता जेंव्हाचे तेंव्हा पाहू अशा शब्दात फडणवीस यांनी त्यावर बोलणे टाळले.
पाहा व्हिडीओ –
पुण्याचे विभाजन होणार, हा नवा वाद कशाला काढता ? राज्य सरकारकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही. मात्र भविष्यात तसा प्रस्ताव येऊ शकतो. मुंबईची तिसरी महापालिका करण्याचाही विचार नाही. नवनवीन वादाचे विषय काढू नका. राज्याला विकासाकडे न्यायचे आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.