शहरात दुचाकींची, चारचाकींची, रिक्षांची, पीएमपी गाडय़ांची वाहतूक होते, तशाच पद्धतीने पादचारी या घटकाचीही वाहतूक होते, हे मानायलाच कोणी तयार नसल्यामुळे संख्येने लाखो असूनही पादचाऱ्यांकडे बघायची इच्छाशक्ती कोणाकडूनही दाखवली नाही हे वास्तव आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड देत चालावे लागत असून पदपथ आणि रस्ते अडवून व्यवसाय करणाऱ्यांवर थातूरमातूर कारवाई करायची अशीच महापालिकेची रीत असल्यामुळे अतिक्रमणांवर कारवाई हाही शहरात फक्त देखावा ठरत आहे.
शहरात लाखो रुपये खर्च करून आणि इंटरलॉकिंग ब्लॉक्स बसवून तयार केलेले पदपथ चालण्यासाठी तयार केलेले असले, तरी अशा सुंदर व गुळगुळीत पदपथांमुळे व्यावसायिकांची चांगलीच सोय झाली आहे. लांब व रुंद पदपथ छोटय़ा-मोठय़ा सर्व रस्त्यांवर तयार होत असल्यामुळे अतिक्रमणेही जोरात सुरू आहेत. तसेच अशा पदपथांवर कायमस्वरुपी टपऱ्या व स्टॉलही टाकले जात आहेत.
पथारीवाले धोरणाचा असाही परिणाम
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार शहरात पथारीवाले धोरण राबवून पथारीवाल्यांना ओळखपत्र देण्याची योजना महापालिकेने हाती घेतल्यामुळे पदपथांवरील तसेच रस्त्यांवरील अतिक्रमणांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ओळखपत्र दिले जाणार असल्यामुळे ज्या पदपथांवर व्यावसायिक नव्हते तेथेही मोठय़ा संख्येने व्यवसाय, टपऱ्या, पथाऱ्या, स्टॉल लागले आहेत. ओळखपत्र मिळवण्यासाठीही गेल्या काही महिन्यात शेकडो अतिक्रमणे गेल्या काही महिन्यात झाली आहेत. त्यामुळेच चालायचे कुठून असा प्रश्न पादचाऱ्यांना जागोजागी पडत आहे.
कर्वे रस्ता
संपूर्ण कर्वे रस्त्यावर दोन्ही बाजूला सलग पदपथच दिसत नाहीत. या रस्त्यावरील पदपथांवर सर्रास टपऱ्या उभ्या करण्यात आल्या आहेत. टपऱ्या, दुकांनानी अगदी रस्त्यापर्यंत विस्तार झाला आहे आणि त्यातून शिल्लक राहिलेल्या जागेवर वाहने उभी करण्यात येतात. त्यामुळे या रस्त्यावरही चालणे कठीणच! काही ठिकाणी पदपथांवरच बसथांबे आहेत. रस्ता ओलांडण्यासाठीही नागरिकांना जीवाशी खेळावे लागते. रस्ता ओलांडण्यासाठी एसएनडिटी महाविद्यालयाजवळ पादचारी पूल आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक, अपंग नागरिकांना त्याचा उपयोग होत नाही. नळस्टॉप चौकातील एक बाजू सतत वाहती असते. या चौकांत पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी वेळच मिळत नाही. गरवारे महाविद्यालयाचा चौक, सह्याद्री रुग्णालयाचा चौक या ठिकाणची परिस्थितीही काहिशी अशीच आहे. हिरवा सिग्नल मिळण्यापूर्वीच वाहने धावू लागतात. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडायला वेळ मिळतच नाही. दोन चौकांच्या मधे या रस्त्यावर ओलांडण्यासाठी पुरेसे ‘वॉक वे’ज नाहीत, दुभाजकही उंच आहेत. खंडुजीबाबा चौकाच्या अलिकडे, विमलाबाई गरवारे शाळेजवळ पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा यासाठी सिग्नल यंत्रणा आहे. मात्र, हा सिग्नल वाहनचालकांकडून पाळलाच जात नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा