Chitale Bakarwadi Case: पुण्यातील चितळे बंधू मिठाईवाले यांची बाकरवडी चांगलीच लोकप्रिय आहे. मात्र गेल्या काही काळापासून चितळेंच्या नावाने मिळणाऱ्या बाकरवडीची चव बदलली असल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली होती. यानंतर पुण्यात चितळेंच्या नावाने आणखी एका दुकानातून चितळेंच्या नावे बाकरवडी विकत असल्याचे समोर आले आहे. या दुकानाच्या मालकावर आता पुणे शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चितळेंच्या नावाने विकल्या जाणाऱ्या बाकरवडीच्या पाकिटावर चितळे बंधू मिठाईवाले यांचा अधिकृत ईमेल आयडी, पत्ता, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सची माहिती छापल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील सदाशिव पेठ परिसरातील ‘चितळे स्वीट होम’ या दुकानाचे मालक प्रमोद प्रभाकर चितळे यांनी त्यांच्या बाकरवडीच्या पाकिटावर मूळ चितळे बंधू मिठाईवाले दुकानाचा अधिकृत ईमेल आयडी, कस्टमर केअर नंबर, उत्पादन आणि इतर संपर्क क्रमांक छापला होता. यामुळे ते विक्री करत असलेली बाकरवडी ही पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवाले यांचीच बाकरवडी असल्याचा भास निर्माण झाला.
चितळे बंधू मिठाईवाले या ब्रँडचे भागीदार असलेल्या इंद्रनील चितळे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या तक्रारीनंतर पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात आता चितळे स्वीट होमच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, मागच्या एक वर्षापासून चितळे बंधू मिठाईवाले यांना बाकरवडीच्या दर्जासंदर्भात तक्रारी प्राप्त होत होत्या. अनेकांनी बाकरवडीची चव बदलली असल्याचे म्हटले होते. त्यानंतर इंद्रनील चितळे यांनी स्वीय सहाय्यक नितीन दळवी यांना या विषयाचा लक्ष घालून छडा लावण्यास सांगितले.
पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना पुढे म्हटले की, ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर दळवी यांनी चितळे स्वीट होम या ब्रँडची बाकरवडी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि शहरातीलच एक मॉलमधील दुकानातून विकत घेतली. तसेच दळवी यांनी सदाशिव पेठ येथील चितळे स्वीट होम या दुकानालाही भेट दिली.
दळवी यांनी गोळा केलेली पाकिटे चितळे बंधू मिठाईवाले यांच्या बाकरवडी उत्पादन केंद्रात चाचणीसाठी पाठविण्यात आली. यातून हे सिद्ध झाले की, चितळे स्वीट होम यांच्याकडून विकली जाणारी बाकरवडी एकसारखी नाही. चितळे बंधू मिठाईवाले यांचे भोर तालुक्यातील रांजे गाव येथे मुख्य उत्पादन केंद्र आहे. तर पर्वती इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये एक छोटे उत्पादन केंद्र आहे.
याचबरोबर चितळे स्वीट होम बाकरवडीच्या पाकिटावर चितळे बंधू मिठाईवाले यांचे संकेतस्थळ, ईमेल आणि आदी माहिती जशीच्या तशी वापरण्यात आली आहे. दळवी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने प्रमोद चितळे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (२), ३५० नुसार गुन्हा दाखल केला. तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (सी), ६६ (डी) नुसारही गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.