लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : चीनमधून ऑनलाइन पद्धतीने कागद मागवून त्यावर भारतीय चलनातील बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ७० हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

ऋतिक चंद्रमणी खडसे (वय २२, रा. देहूगाव, मूळ वाशिम), सूरज श्रीराम यादव (वय ४१, रा.च-होली) आकाश विराज धंगेकर (वय २२, आकुर्डी), सुयोग दिनकर साळुंखे (वय ३३, रा. आकुर्डी), तेजस सुकदेव बल्लाळ (वय १९, रा. धाराशिव) आणि प्रणव सुनील गव्हाणे (वय ३०, रा. आळंदी रस्ता, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आणखी वाचा-पिंपरी चिंचवड : १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने केली मित्राची हत्या, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

आरोपी ऋतिक हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पदविकाधारक आहे. तो खासगी कंपनीत नोकरी करतो. छपाईचा व्यवसाय करण्यासाठी आरोपींनी दिघीतील मॅगझिन चौक परिसरात गाळा भाडेतत्वावर घेतला होता. पुण्यातील अप्पा बळवंत चौकातून छपाईचे जुने मशीन आणले होते. परंतु, छपाईची कामे मिळाली नाहीत. गाळ्याचे भाडे आणि इतर खर्च वाढला. आरोपी सूरजला नोटांचे डिझाइन करता येते, चलनी नोटा छापल्याचा फायदा होईल असे त्याने सांगितले. त्यानुसार अलिबाबा संकेतस्थळावरुन तेजसच्या पत्त्यावर चीनमधून कागद मागविला. दोन लाख बनावट नोटा छापता येतील, इतका कागद चीन मधून मागविण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात ७० हजारांच्या ५०० रुपयांच्या नोटांची छपाई केली होती. पोलिसांनी बनावट नोटा, छपाई मशिनसह पाच लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष जाधव यांनी सांगितले.

Story img Loader