लोणावळा शहरात बनावट नोटा चलनात आणताना पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून एक हजाराच्या दोन लाख २२ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. अटक केलेले आरोपी हे पश्चिम बंगालमधील मालडा जिल्ह्य़ातील आहेत.
कजमुल हक हुरमुंद अलीशेख (२०), अबु कलाम शेख (वय २१), आलम शेख साहेब शेख (वय २५), बबलु जनावली शेख (वय २४), खालीख शेख (वय २२), अब्दुल रज्जक केताबुद्दीन शेख (वय २५, सर्व रा. सध्या- सानपाडा, नवी मुंबई, मूळ- मालडा, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील एका दुकानातून कजमुल शेख याने साठ रुपयांची चिक्की खरेदी करून हजार रुपयांची नोट दिली. सुट्टे पैसे घेऊन तो गेला असता, दुकानदाराला संशय आल्याने त्याने नोट तपासली. या तपासणीत ती खोटी असल्याचे दिसून आले.
हा प्रकार लक्षात येताच दुकानदाराने तत्काळ लोणावळा शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस जागेवर पोहोचले असता कजमुल दुसऱ्या दुकानात हजार रुपयांची नोट देऊन चिक्की खरेदी करताना दिसला. त्याला व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे एक हजार रुपयांच्या २२ नोटा सापडल्या. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांचे साथीदार नवी मुंबईतील सानपाडा येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे छापा टाकून त्यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडे एक हजार रुपयांच्या दोनशे बनावट नोटा सापडल्या.
लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विष्णू पवार यांनी सांगितले की, लोणावळा येथे दोन आरोपी एक हजार रुपयांची बनावट नोट देऊन छोटय़ा वस्तू खरेदी करत आणि खऱ्या नोटा घेऊन गायब होत. या बनावट नोटा बांगला देशातून आणल्याचे ते सांगत आहेत.
पश्चिम बंगालच्या पोलिसांकडून असहकार्य
महाराष्ट्रात बनावट नोटा चलनात आणताना अटक केलेले बहुतांश आरोपी ही पश्चिम बंगाल मधील मालडा जिल्ह्य़ातील आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील पोलिसांना या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी पश्चिम बंगालमध्ये जावे लागते. पण, तेथे स्थानिक पोलीस मदत करत नाहीत. तसेच योग्य ती माहिती देत नाहीत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader