पिंपरी : शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत पाल्यांच्या प्रवेशासाठी खोटा रहिवासी पुरावा सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी १८ पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. हा प्रकार जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत भुगाव येथील माताळवाडीमध्ये घडला.

याप्रकरणी मुळशीच्या गट शिक्षण अधिकारी सुजाता देशमाने यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १८ पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील काही बड्या खासगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत सुमारे ९५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. शिक्षण विभागाने केलेल्या छाननीमध्ये १८ आरोपी पालकांनी त्यांच्या पाल्यांचा खोटा रहिवासी पुरावा सादर करून २५ टक्के अंतर्गत प्रवेश घेतल्याचे समोर आले.

शासनाची दिशाभुल करून फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांवर खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला फौजदार जाधव तपास करीत आहेत.

हॉटेलमध्ये तोडफोड

बिलावरून झालेल्या भांडणाचा रागातून सात जणांच्या टोळक्याने हॉटेलमध्ये तोडफोड केली. तसेच हॉटेलमधील कामगारांना मारहाण करून जखमी केले. हॉटेलच्या काउंटर मधून पैसे चोरले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना खेड तालुक्यातील रासे येथे घडली. वैभव रत्नाकर घागरमाळे (वय २१), सुरज बलभीम घुमरे (वय २२, दोघे रा. कडाचीवाडी, खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शुभम सुनील मुंगसे (वय २८, रा. रासे, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम यांचे रासे येथे हॉटेल आहे. आरोपी हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले. जेवण झाल्यानंतर बिलावरून त्यांच्यात वाद झाला. आरोपींनी हॉटेलमधील कामगारांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी पुन्हा हॉटेलमध्ये आले. त्यांनी हॉटेलमध्ये येऊन तोडफोड केली. दुपारी झालेल्या भांडणाच्या कारणावरून हॉटेलमधील कामगारांना मारहाण करून जखमी केले. तसेच हॉटेलच्या कॅश काऊंटर मधून पाच हजार रुपये चोरून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Story img Loader