पुणे : लोहमार्ग पोलीस दलातील भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या उमेदवारास न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सागर लालसिंग राठोड (वय ३१, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे शिक्षा सुनावलेल्या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा…पिंपरी : मोबाईल दिला नाही म्हणून घरात घुसून मैत्रिणीवर कोयत्याने वार
पुणे लोहमार्ग पोलीस दलातील भरती प्रक्रियेत राठोड याने बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात राठोडविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले सरकार पक्षाच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने राठोडला विविध कलमांन्वये दोषी ठरवले. त्याला खडकी न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाच वर्ष सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड यांनी याप्रकरणाचा तपास केला होता.