मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात श्रेयाची लढाई सुरू असल्यामुळेच ‘सह्य़ाद्री’ व पुण्यात वेगवेगळ्या बैठकांचे सत्र सुरू असते. त्यांच्यातील अंतर्गत लढाई व दोन्ही काँग्रेसच्या वादात निर्णय मात्र होत नाहीत. तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो, असे त्यांचे नाटक असल्याची टीका शिवसेनेच्या प्रवक्तया डॉ. नीलम गोऱ्हे यांनी थेरगाव येथे बोलताना केली. जनतेची दिशाभूल करणाऱ्या बाबा, दादांना जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या महायुतीच्या जनजागृती सभांचा समारोप बाळकृष्ण मंगल कार्यालयात झाला, तेव्हा त्या बोलत होत्या. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख मच्िंछद्र खराडे, उमेश चांदगुडे, बाबा धुमाळ, शहरप्रमुख भगवान वाल्हेकर, भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, पश्चिम महाराष्ट्राचे संघटक एकनाथ पवार, नागरी हक्क समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, नगरसेविका सुलभा उबाळे, संगीता भोंडवे आदी उपस्थित होते. दहा डिसेंबरला नागपूरला मोर्चा काढण्यात येणार असून त्यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या,की अनेक दिवसांपासून बांधकामांचा प्रश्न रखडला असून नागरिकांना कोणी वाली राहिलेला नाही. ‘उल्हासनगर पॅटर्न’ वापरून ही बांधकामे नियमित करण्याचे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंब्य्रात केले होते. मात्र, कायदाच न झाल्याने उल्हासनगर येथील बांधकामे आजही अनियमित राहिली आहेत. सरकार खोटी आश्वासने देते. जमिनी घेते, मोबदला देत नाही. विकासही नाही व मोबदलाही न देता शेतकऱ्यांवर अन्याय करणारी प्राधिकरणे बरखास्त केली पाहिजेत, असे त्या म्हणाल्या. चहा बनवणारा देशाचे नेतृत्व करू शकतो का, या राहुल गांधी यांच्या टीकेवर, सोनिया गांधी करू शकतात, तर कोणीही करू शकतो, अशी टिप्पणी त्यांनी केली. सरकार घाईने चुकीची विधेयके मांडतात, असे सांगत हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यपध्दतीविषयी डॉ. गोऱ्हे यांनी टीका केली. िपपरी-चिंचवडचा विकास झाल्याचे दिसत असले तरी वास्तवात तशी परिस्थिती नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘पाटबंधारे’ च्या फाईली तुरुतुरू पळतात
पाटबंधारे विभागाच्या फाईली तुरूतुरू पळतात. मात्र, अनधिकृत बांधकामांचा विषय गोगलगाईच्या गतीने जातो. तुमच्या सोईची कामे वेगाने होतात, सामान्यांच्या निर्णयांना विलंब का लागतो? अजितदादा तडफ दाखवून राजीनाम्याचा इशारा देतात, मात्र, तशी वेळ येणार नाही. त्यांना जनताच घरी बसवणार, अशी टीका डॉ. गोऱ्हे यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा