लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: शाळा सोडल्याचा दाखला मिळवून देण्यासाठी एका महिलेकडून ९१ हजार रुपये उकळणाऱ्या तोतया पत्रकाराला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. हनुमंत राजकुमार सुरवसे (रा. माळीमळा, लोणी काळभोर, सोलापूर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पत्रकाराचे नाव आहे. याबाबत एका महिलेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुरवसे याचे महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज नेटवर्क नावाचे युट्युब चॅनेल आहे. करोना संसर्ग काळात एका महिलेने मुलाचे शालेय शुल्क भरले नव्हते. महिलेची आर्थिक परिस्थिती बेताची होती. महिलेने मदतीसाठी सुरवसेशी संपर्क साधला. महिलेने मुलाला शाळेतून काढून टाकण्याचे ठरविले होते. मात्र, शाळेकडून दाखला देण्यात येत नव्हता. तेव्हा सुरवसेने शाळेत ओळख असल्याचे सांगून महिलेकडून एक लाख रुपयांची मागणी केली.

हेही वाचा… पुणे : बनावट सोन्याची विक्री करून सराफांची फसवणूक करणारी मध्यप्रदेशातील महिला अटकेत

त्याने महिलेकडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरुपात ९१ हजार रुपये घेतले. महिलेला दाखला काढून दिला नाही. तिने सुरवसेकडे विचारणा केली. तेव्हा मी पत्रकार आहे. माझ्या विरोधात पोलिसांकडे तक्रार कशी करते, असे सांगून तिला धमकावले. सुरवसेने शिवीगाळ करुन विनयभंग केल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर सुरवसेला अटक करण्यात आली. त्याच्या विरुद्ध विनयभंग तसेच फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा… माऊलींचा पालखी रथ ओढण्याचा मान आळंदीमधील भोसले कुटुंबाला, सर्जा-राजा बैलजोडी सज्ज

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, उपनिरीक्षक वैभव मोरे, कर्मचारी संतोष राठोड आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake journalist arrested for cheating a woman in pune print news dvr