पिंपरी पालिकेचे ‘कारभारी’ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी ‘घरकुल’ विषयी चर्चा घडवून आणली, तेव्हा प्रकल्पाच्या जागेच्या ११४ कोटींचा अतिरिक्त भार लाभार्थ्यांवर पडणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र, तरीही आमदार विलास लांडे आम्हाला खोटे ठरवतानाच मुख्यमंत्र्यांचाही अपमान करत आहेत. वास्तविक खोटे बोलण्यात लांडे पटाईत असून खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणे हा राष्ट्रवादीचा धंदा असल्याची टीका शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी केली आहे.
घरकुलच्या जागेसाठीचे ११४ कोटी रुपये शासनाने माफ केल्याचे सांगत भाजपने आनंदोत्सव साजरा केला. तथापि केवळ चर्चा झाली व निर्णय झाला नसल्याचे लांडेंनी निदर्शनास आणून दिल्याने भाजप तोंडघशी पडल्याचे चित्र आहे. त्यावर भाजपने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सभागृहातील भाषण व सभावृत्तान्त पत्रकार परिषदेत मांडला. महापालिका व प्राधिकरणाच्या वादात लाभार्थ्यांवर भार पडू देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र शासनाने ती रक्कम माफ केल्याची घोषणा भाजपने केल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली. तरीही हा प्रश्न सुटल्याचा युक्तिवाद पवारांनी केला आहे.
पवार म्हणाले, विलास लांडे स्वत:च्या निष्क्रियतेवर पांघरूण घालण्यासाठी घरकुलधारकांची दिशाभूल करत आहेत. लांडे आमदार, त्यांच्या पत्नी महापौर व भाऊ नगरसेवक आहे. घरात इतकी पदे असूनही केवळ मिरवण्यापलीकडे ते काहीही करत नाहीत. खोटा अध्यादेश वाटून ते निवडून आले होते. अनधिकृत बांधकामप्रकरणी तीनही आमदारांनी जनतेची फसवणूक केली आहे. ठाण्यातील आमदार जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरले, राष्ट्रवादीचे आमदार काय करतात. सत्ता असूनही सहा वर्षे घरकुलचा प्रश्न का सुटला नाही, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. भाजपच्या प्रयत्नाने घरकुलचा मोठा अडसर दूर झाल्याने लांडे यांना झोंबले म्हणूनच दिशाभूल करणारी शेरेबाजी ते करत आहेत.
खोटी आश्वासने हा तर राष्ट्रवादीचा धंदा- एकनाथ पवार
खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणे हा राष्ट्रवादीचा धंदा असल्याची टीका शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी केली आहे.
First published on: 29-04-2013 at 02:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake promises is the only job for ncp eknath pawar