लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावावर बोगस मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. खुद्द शिंदे यांनी हा आरोप केला आहे.

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सेंट मीरा स्कूलमध्ये मतदानासाठी गेल्यानंतर त्यांच्या नावावर मतदान झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या नावावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मतदान करून गेल्याचे स्पष्ट झाले. परंतु तरीही शिंदे यांना टेंडर व्होट अंतर्गत मतदान करण्याची संधी दिली गेली. मात्र, त्याची गणना आपत्कालीन परिस्थितीत केली जाऊ शकते. त्यामुळे शिंदे यांचे मत वाया गेल्यातच जमा आहे.

आणखी वाचा-काँग्रेसचा बॅनर लावून चिठ्ठ्यांचे वाटप; कसब्यात भाजपचे आंदोलन

याबाबत अरविंद शिंदे म्हणाले, ” मी सकाळी ११ ते १२ दरम्यान सेंट मीराज् स्कूल मध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलो होतो. त्यावेळी पोलिंग बूथच्या रजिस्टरमध्ये माझ्या नावावर कोणीतरी मतदान केल्याचाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या संदर्भात मी संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. दरम्यान टेंडर व्होट सुविधेअंतर्गत मला मतदान करण्याची संधी दिली गेली आहे. परंतु त्या मताची गणना केली जाईल की नाही याबाबत शंका आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांना भेटणार आहे. “

Story img Loader