पुणे : जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी (एचएसआरपी) लावण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कंपनीच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करून पैसे लुटले जात असल्याचे समोर आले आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) तक्रारी होत आहेत. सायबर पोलीस ठाण्यातही या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, २३ फेब्रुवारीपर्यंत शहरातून १६ हजारांहून अधिक नागरिकांच्या वाहनांना पाटी बसविण्यात आली आहे, तर २४ हजार नोंदणीधारकांनी वेळ घेतली असून, ८० हजारांहून अधिक नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली असल्याची माहिती पुणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) देण्यात आली.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या निर्देशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना ‘एचएसआरपी’ लावण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. ‘आरटीओ’कडून पुणे शहरासह इतर १२ आरटीओ कार्यालयांसाठी रोजमार्टा कंपनीची नियुक्ती केली आहे. मुदतीचे दिवस कमी होत असताना वाहनधारकांकडून नोंदणी करण्यासाठी धावपळ सुरू आहे. पुणे शहरात २५ लाखांहून अधिक जुने वाहनधारक असून, २३ फेब्रुवारीपर्यंत ८० हजार ६०४ वाहनधारकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २४ हजार ४१ नोंदणीधारकांना वाहन तपासणीसाठी वेळ नियुक्त करण्यात आली असून, १६ हजार ४५४ वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविल्या आहेत, अशी माहिती ‘आरटीओ’कडून देण्यात आली.

ऑनलाइन शुल्क भरताना समस्या

नागरिकांकडून संकेतस्थळांवर नोंदणी करण्यात येत आहे. दुचाकीसाठी ४५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. मात्र ऑनलाइन शुल्क भरताना अनेक संकेतस्थळे खुली होत आहेत. अनेक नागरिकांच्या बँक खात्यांमधून पैसे वजा होऊनही पैसे प्राप्त झाले नसल्याचा संदेश मिळत आहे. त्यामुळे एकाच व्यवहारासाठी पुन्हा एकदा पैसे भरण्यास सांगितले जात आहे. ऑनलाइन व्यवहाराचे कुठलेच संदेश अथवा नोंदणीची माहिती ई-मेल किंवा मोबाइल क्रमांकावर प्राप्त होत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम वाढत आहे. काही जणांनी ‘आरटीओ’ कार्यालयात धाव घेऊन बँक खात्यातून पैसे वजा झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

उच्च सुरक्षा क्रमांक पाटी लावण्यासाठी नोंदणीधारकांचा प्रतिसाद वाढला आहे. शासनाकडून पुणे शहरासाठी ६९ केंद्रे सुरू केली आहेत. दरम्यान, बनावट संकेतस्थळ निर्माण करून नागरिकांच्या खात्यावरून पैसे गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत सायबर पोलिसांना कळविण्यात आले आहे, तरी नागरिकांनी सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाचाच उपयोग करावा. – स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

उच्च सुरक्षा क्रमांकाटी पाटी लावण्यासाठी मी स्वत: ऑनलाइन नोंदणी केली. माहिती भरल्यानंतर पैसे भरण्यासाठी नवीन संकेतस्थळ खुले झाले. त्यानुसार ४५० रुपये, जीएसटी आणि गेटवे अॅपची रक्कम मिळून ५०० रुपये भरण्यासाठी प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, बँक खात्यातून ८९९ रुपये वजा केल्याचा संदेश प्राप्त झाला. मात्र, संबंधित कंपनीकडून कुठलाही संदेश अथवा इ-मेल प्राप्त झाला नाही. विशेष म्हणजे पुन्हा पैसे भरण्यासाठी प्रक्रिया करावी असा संदेश प्राप्त होत आहे. याबाबत पुणे सायबर पोलीस ठाण्यात वैयक्तिक तक्रार करण्यात आली आहे. – कैलास गायकवाड, तक्रारदार

Story img Loader