पुणे : थंडीत सहाशे रुपये किलो असे उच्चांकी दर मिळालेल्या शेवग्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शेवग्याची बाजारात मुबलक आवक होत असून, किरकोळ बाजारात एक किलो शेवग्याला ४० ते ५० रुपये किलो असे दर मिळाले आहेत.
डिसेंबर महिन्यात दक्षिणेकडील राज्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेवग्याच्या लागवडीला फटका बसला होता. किरकोळ बाजारात एक किलो शेवग्याला प्रतवारीनुसार ५०० ते ६०० रुपये किलो असे भाव मिळाले होते. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात शेवग्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर भागात शेवग्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. उन्हाळ्यामुळे सध्या बाजारात शेवग्याची आवक वाढली आहे. उष्मा वाढल्याने शेतकऱ्यांनी शेवग्याची तोड करून बाजारात विक्रीस पाठविला आहे. आवक वाढल्याने शेवग्याच्या दरात घट झाली आहे. घाऊक बाजारात दहा किलो शेवग्याला प्रतवारीनुसार १०० ते २०० रुपये असे दर मिळाले असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील शेवगा व्यापारी रामदास काटकर यांनी दिली.
घाऊक बाजारात एक किलो शेवग्याला प्रतवारीनुसार दहा ते वीस रुपये दर मिळाले आहेत. शेवग्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असून, मागणी बेताची आहे. थंडीत शेवग्याची तोड कमी प्रमाणावर केली जाते. त्यामुळे थंडीत शेवग्याचे दर तेजीत असतात. मार्च, एप्रिल महिन्यात शेवग्याची आवक वाढते. सध्या बाजारात आवक होत असलेल्या शेवग्याची प्रतवारी चांगली आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात स्थानिक भागातील शेवग्याची एक हजार ते १५०० डाग (पिशवी) अशी आवक होत आहे. एका पिशवीत साधारणपणे ३० किलो शेवगा असतो, असे त्यांनी सांगितले.
शेवग्याचे दर
घाऊक बाजार (दहा किलो) – १०० ते २०० रुपये
किरकोळ बाजार (एक किलो) – ४० ते ५० रुपये
उष्मा वाढल्यानंतर बाजारात शेवग्याची आवक मोठ्या प्रमाणावर होते. सध्या बाजारात स्थानिक शेवग्याची आवक होत आहे. आवक मुबलक होत असून, मागणी बेताची आहे. थंडीत शेवग्याला उच्चांकी दर मिळाले होते. उच्चांकी दर मिळाल्यानंतर पंढरपूर भागातील शेवग्याची आवक सुरू झाली. त्यानंतर शेवग्याच्या दरात टप्याटप्याने घट झाली. – रामदास काटकर, शेवगा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड, पुणे
शेवगा उष्ण असल्याने उन्हाळ्यात मागणी कमी होते. सध्या शेवग्याला मागणी कमी झाली असून, दरात आणखी घट होण्याची शक्यता आहे.- प्रकाश ढमढेरे, भाजीपाला व्यापारी, किरकोळ बाजार