पुणे : शहरातील खासगी रुग्णालयांच्या विरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे खोट्या तक्रारी केल्या जात आहेत. या तक्रारींच्या आधारे रुग्णालयांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये असंतोष असून, याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाने मंडळाला पत्र लिहिले आहे. खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. सुनील इंगळे आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी मंडळाला हे पत्र लिहिले आहे. या पत्रात रुग्णालयांच्या विरोधातील खोट्या तक्रारींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. काही ठरावीक व्यक्ती रुग्णालयांच्या विरोधात सातत्याने तक्रारी करीत आहेत. रुग्णालयांनी सर्व नियमांचे पालन करूनही या तक्रारी केल्या जात आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने रुग्णालयांना त्रास दिला जात आहे. यामुळे रुग्णालयांवर अनावश्यक बाबींचा ताण येत आहे, असे पत्रात म्हटले आहे.
कोणत्याही आधाराविना करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने मंडळाने योग्य ती कार्यवाही करावी. आम्ही सर्व नियमांचे पालन करण्यास प्राधान्य देत आहोत. आरोग्य सुविधांचे प्रमुख लक्ष्य हे रुग्णसेवा आहे. या सर्व प्रकारांमुळे कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींमध्ये वाढ येऊन आरोग्य सुविधांवरील ताण वाढत आहे. नियमांचे पालन तपासतानाच मंडळाकडून अत्यावश्यक असलेल्या आरोग्य सुविधांचे हित जपले जाईल, अशी अपेक्षा आहे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
खासगी रुग्णालयांच्या मागण्या
– रुग्णालयांच्या विरोधातील तक्रारींची प्रक्रिया पारदर्शक असावी.
– मंडळाने तक्रारींवर कार्यवाही करण्याआधी त्याची सत्यता तपासावी.
– केवळ तक्रारीच्या आधारे थेट कारवाई मंडळाने करू नये.
– रुग्णालयांवरील कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींचा ताण वाढवू नये.
– खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर मंडळाने कायदेशीर कारवाई करावी.
महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या नावाखाली फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशी फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या संदर्भात पाठविलेल्या पत्रावर योग्य ती कार्यवाही सुरू आहे. – जगन्नाथ साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ