पुणे : खडकीतील दारुगोळा कारखान्यातून झालेल्या काडतुसे चोरी प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. दारुगोळा कारखान्यातील कर्मचाऱ्याकडून पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेने २२ काडतुसे जप्त केली होती. प्राथमिक तपासात काडतुसे चोरीचा हा प्रकार असल्याचा संशय होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात साडूने कौटुंबिक वादातून साडूचा काटा काढण्यासाठी दुचाकीच्या डिकीत चोरलेली काडतुसे लपविल्याचे उघडकीस आले आहे. खडकी पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे.
रवींद्र रमेश गोरे (वय ४३) याला अटक करण्यात आली. यापूर्वी काडतुसे चोरी प्रकरणात गणेश बोरूडे (वय ३९, रा. कल्पतरू सोसायटी, खराडी) याला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरे आणि बोरूडे नात्याने मावस साडू आहेत. दोघेही खडकीतील दारुगोळा कारखान्यात कामाला आहेत. गोरे दारुगोळा कारखान्यातून बुटात काडतुसे लपवून चोरून आणायचा. कौटुंबिक वादातून त्याने बोरूडेंचा काटा काढण्याचे ठरविले होते. चोरलेली काडतुसे त्याने साठविली होती. चोरलेली काडतुसे त्याने बोरुडेंच्या दुचाकीच्या डिकीत लपवून ठेवली होती. त्यानंतर बोरूडेंनी काडतुसे चोरल्याची माहिती त्याने कारखान्यातील अन्य कर्मचाऱ्यांना दिली. चोरी प्रकरणाची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाल्यानंतर २८ मार्च रोजी सायंकाळी खडकी पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने दारुगोळा कारखान्याबाहेर सापळा लावून बोरूडेंना पकडले होते.
त्यांच्या दुचाकीच्या डिकीतून २२ काडतुसे जप्त करण्यात आली होती. याबाबत दारूगोळा कारखान्यातील कनिष्ठ अभियंता जयेंद्र कस्तुरी यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
खडकी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. दरम्यान, कौटुंबिक वादातून गोरेने बोरुडेंचा काटा काढण्यासाठी चोरलेली काडतुसे त्याच्या दुचाकीच्या डिकीत लपविल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर गोरेची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली, असे पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी सांगितले.