पुणे : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराच्या कुटुंबीयांना लोकअदालतीत सव्वा कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. अपघातात दुचाकीस्वाराचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. मुलाला ७५ लाखांची नुकसान भरपाई देण्यात आली. घरातील कर्ता गमाविल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. लोकअदालतीत दावा तडजोडीत निकाली काढून एकूण मिळून दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाल्याने कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव फाटा येथे २६ फेब्रुवारी २०२१ रोजी भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार प्रवीण धेंडे (वय ४९) यांचा मृत्यू झाला होता. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी अभिषेक प्रवीण धेंडे (वय २४) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होते. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोटारचालकाला करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध न्यायालायत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. अपघात प्रकरणची सुनावणी प्रलंबित आहे.
हेही वाचा…संघर्ष हा धर्म आहे, प्रत्येकाने धर्मासाठी योगदान दिले पाहिजे – सरसंघचालक मोहन भागवत
अपघातात मृत्युमुखी पडलेले धेंडे हे एका रायासनिक कारखान्यात वरिष्ठ तांत्रिक व्यवस्थापक पदावर नियुक्तीस होते. त्यांचा मुलगा अभिषेक अभियांत्रिकी शाखेत प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. अपघातात कुटुंबातील कर्ता गेल्याने प्रवीण धेंडे यांची पत्नी, आई, तसेच अभिषेकच्या भावाने मोटार अपघात न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अभिषेकने नुकसान भरपाईसाठी मोटार अपघात न्यायाधिकरणात स्वतंत्र दावा दाखल केला. धेंडे कुटुंबीयांकडून ॲड. भास्कर सूर्यवंशी यांनी बाजू मांडली.
संबंधित दावा न्यायालयात प्रलंबित होता. मोटारीचा विमा उतरविणाऱ्या कंपनीने दावा लोकअदालतीत तडजोडीत निकाली काढण्याची सहमती दर्शविली होती. धेंडे कुटुंबीयांनी दावा तडजोडीत निकाली काढण्यास सहमती दर्शविली होती. त्यानंतर विमा कंपनी आणि धेंडे कुटुंबीयात लोकअदालतीत तडजोड करण्यात आली. धेंडे कुटुंबियांनी दाखल केलेल्या संयुक्त दाव्यात सव्वा कोटी रुपये भरपाई देण्याचे विमा कंपनीने मान्य केले, तसेच धेंडे यांचा मुलगा अभिषेकने दाखल केलेल्या दाव्यात ७५ लाख रुपये देण्याचे विमा कंपनीने मान्य केले. त्यामुळे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसलेल्या या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला, असे ॲड. भास्कर. सूर्यवंशी यांनी नमूद केले.