दोन अपत्यांनंतर मूल नको म्हणणाऱ्या जोडप्यांच्या संख्येने शहरात समाधानकारक पातळी गाठली असून गेल्या दीड वर्षांची आकडेवारी पाहता एकूण शस्त्रक्रियांपैकी दोन अपत्यांनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या जोडप्यांचे प्रमाण सातत्याने ६९ टक्के राहिले आहे.
गेल्या वर्षी (एप्रिल २०१२ ते मार्च २०१३) शहरात एकूण १३०३९ कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. यात जोडप्यांनी दोन अपत्यांनंतर करून घेतलेल्या शस्त्रक्रियांची संख्या ९००८ होती. तर गेल्या नऊ महिन्यांत डिसेंबरअखेर एकूण ९१६६ शस्त्रक्रिया झाल्या असून त्यातील ६३५८ शस्त्रक्रिया दोन अपत्यांनंतर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या शस्त्रक्रियांचे प्रमाण ६९ टक्के असे कायम राहिले आहे. पालिकेच्या आरोग्य उपप्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी ही माहिती दिली.
सर्व शासकीय रुग्णालयांत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. डॉ. साबणे म्हणाल्या, ‘‘शहरातील झोपडपट्टी भागात कुटुंब कल्याण केंद्राद्वारे जननक्षम जोडप्यांचे सर्वेक्षण केले जाते. या वेळी जोडप्यांना दोन मुलांनंतर शस्त्रक्रिया करून घेण्याचे आवाहन केले जाते. पालिकेच्या प्रसूतिगृहांमध्येही तपासणीसाठी आलेल्या गरोदर मातांना परिचारिकांकडून याबाबत माहिती दिली जाते. वारंवार प्रसूतीमुळे रक्तक्षयासारख्या आजारांचे धोकेही टाळले जातात.’’

Story img Loader