संगीत श्रवणामुळे महाराष्ट्रामध्ये कान चांगले तयार झाले. पण, कलेकडे निकोप दृष्टीने पाहाण्याची नजर नसल्याने आमचे डोळे कधी उघडणार?, असा सवाल ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी गुरुवारी उपस्थित केला. राजकीय धुराळा-गुलाल यातून रंगलेले चेहरे, हे करायला हवे होते की ते अशा वृत्तवाहिन्यांवर घडणाऱ्या चर्चा यामध्ये आपण इतके गुरफटून गेलोय की इतर कोणताच विचार करीत नाही. ही अस्वस्थ करणारी बाब आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अनुबंध प्रकाशनाच्यावतीने प्रसिद्ध कला दिग्दर्शक व चित्रकार सुबोध गुरुजी यांच्या ‘पाऊलखुणा’ या पुस्तकाचे प्रकाशन अमोल पालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी पालेकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, ज्येष्ठ चित्रकार रघुवीर कुल, चित्रपट अभ्यासक योगेश्वर गंधे आणि प्रकाशक अनिल कुलकर्णी उपस्थित होते.
हेही वाचा- पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या कामाला ६ ऑक्टोबरपासून प्रारंभ
जिवंत माणसाने तयार केलेली जिवंत कला नामशेष
पालेकर म्हणाले, संगणक सगळं करू शकत असेल, तर आजच्या काळात चित्रकारांची आवश्यकताच काय? हा कलावंतांचा प्रश्न असल्याने त्यांचे त्यांनी पाहावे अशी समाजात एक मानसिकता तयार झाली आहे. कलावंत आणि समाज यांचे नातं आपण जपू शकतो का? कलेबद्दल आस्था ठेवणाऱ्या रसिकांनी हा प्रश्न बाजूला न ठेवता त्याला सामोरे जायला हवे. जिवंत माणसाने तयार केलेली जिवंत कला ही पाहता पाहता नामशेष झाली. कलेतील मानवीयता जपणार आहोत का? असा सवालही पालेकरांनी उपस्थित केला.
हेही वाचा- तांदूळ निर्यात यंदा संकटात ; करनिर्णयामुळे बंदरांवर दहा लाख टन तांदूळ पडून; नोव्हेंबरमध्ये निर्णय
नेत्यांच्या होर्डिंगमुळे चांगली कला पाहणे आपण विसरलो
नेत्यांच्या होर्डिंगमुळे चांगली कला पाहणेच आपण विसरून गेलो आहोत. स्वच्छ निकोप दृश्य काय असते हेच आपल्याला माहिती नाही. आपणच उघड्या डोळ्यांनी कला बाहेर ढकलली आहे, याकडे पालेकर यांनी लक्ष वेधले. इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची आवश्यकता सध्याच्या काळात उच्च रवात सांगितली जाते. मात्र, भारतीय चित्रपटसृष्टी कशी उलगडत गेली, त्यात काय काय प्रयोग करण्यात आले हे समोर आले, तर पुन्हा भारतीय चित्रपटांकडे नजर टाकल्यासारखे होईल, असे मत अमोल पालेकर यांनी व्यक्त केले.