वेळू हे तसं पुणे जिल्ह्य़ातलं अगदी छोटसं गाव. पुण्याहून कोल्हापूरकडे जाताना कात्रजचा घाट ओलांडू पुढे गेल्यावर हे वेळू लागतं. वेळूत पाच वर्षांपूर्वी मंगेश काळे या तरुणानं मोठा हिय्या करून अगदी महामार्गालगतच मिसळीचं हॉटेल सुरू केलं. मंगेशची गावात थोडी वडिलोपार्जित शेती आहे. पण त्याचा मूळचा पिंड चटकदार पदार्थ बनवण्याचा आणि ते खिलवण्याचा. जेजुरीत मामांच्या हॉटेलमध्ये घेतलेला तब्बल सोळा-सतरा वर्षांचा या कामाचा अनुभव त्याच्या गाठीशी होता. त्यातून मंगेशनी ठरवलं, की चला आता आपल्याच गावात मिसळीचं हॉटेल सुरू करू या.

आता तुम्ही म्हणाल, पुण्यात मिसळ शेकडो ठिकाणी मिळते आणि महामार्गावरही मिसळची हॉटेल आहेतच की. मग त्यात एवढं विशेष काय आहे. तर आहे. मंगेशनी सुरू केलेल्या ‘साईछाया मिसळ हाऊस’मध्ये नक्कीच काही तरी विशेष आहे. मिसळींमध्येही वैविध्य असतं. त्यातल्या त्यात प्रसिद्ध म्हणजे कोल्हापुरी मिसळ. तशी पुण्यातली बेडेकर मिसळ, तुळशीबागेतली श्रीकृष्ण मिसळ, फडके हौदाजवळची वैद्य मिसळ, कर्वे रस्त्यावरची काटाकिर्र मिसळ.. यादी खूप लांबेलही. त्यातली एकही मिसळ दुसरीसारखी नाही, हे खरं वैशिष्टय़. तेच वैशिष्टय़ मंगेशनी जपण्याचा प्रयत्न वेळूत केला आणि त्यात तो चांगलाच यशस्वी झाला.

..तर या साईछाया मिसळीचं वैशिष्टय़ं हे, की या मिसळीचा रस्सा तांबडा किंवा लाल किंवा लाल भडक किंवा अतितिखट नसतो तर तो काळा असतो. हा रस्सा काळा का, तर या रश्श्यासाठी म्हणजे सँपलसाठी वापरला जाणारा काळा मसाला. काळा मसाला हे या मिसळीचं मूळ. हा प्रकार पुणेकरांना हटके वाटला. त्यामुळे मंगेशची मिसळ खवय्यांनी चांगलीच उचलून धरली. कोल्हापूरकडे जाणाऱ्या पुणेकरांच्या गाडय़ा हक्कानं वेळूला थांबायला लागल्या.

पुणेकरांचा हा प्रतिसाद मंगेशसाठी नव्या हॉटेलची प्रेरणा देणारा ठरला आणि दीड वर्षांपूर्वी त्याने पुण्यात टिळक रस्त्यावर हिराबाग चौकात साईछाया मिसळ हाऊस सुरू केलं. वेळूतलं हॉटेल आता त्याची आई छाया आणि पत्नी तेजस्विनी या दोघी बघतात, तर रोज पुण्यात येऊन मंगेश पुण्यातल्या मिसळप्रेमींना खूश करतो. खवय्यांना मिसळीचा आनंद द्यायचा तर इतर कोणतेही म्हणजे भजी, वडे वगैरे पदार्थ विकायचे नाहीत हा त्याचा शिरस्ता. म्हणून इथं जायचं तर फक्त मिसळ खायलाच! मिसळ खाऊन झाल्यावर ताजं ताक किंवा चहा-कॉफी एवढेच पदार्थ इथे उपलब्ध आहेत. त्याशिवाय जरा बदल म्हणून खजुराचा किंवा दाण्याचा लाडू आणि खोबरा बर्फीचाही आस्वाद तुम्ही इथे घेऊ शकता.

या मिसळीतल्या काळ्या रश्श्याची चव नेहमीच्या लाल भडक रश्श्यासारखी नाही. तसा तो तिखटजाळही नाही. काळा मसाला वापरून आणि त्याला वाटण-घाटणाची जोड देऊन इथला रस्सा अधिकच चविष्ट बनवला जातो. शिवाय मिसळीतही मटकी अणि खास तयार करून घेतलेली शेव, फरसाण, पापडी एवढेच पदार्थ असतात. मिसळीबरोबर पाव, शेव, कांदा, लिंबू, तळलेला पापड आणि रश्श्याचा मग येतो. इथे तुम्ही रस्सा आणि कांदा, लिंबू अगदी अमर्याद घेऊ शकता. त्यासाठी वेगळे पैसे आकारण्याची पद्धत नाही. शिवाय इथे खवय्याला हक्कानं आणि आग्रहानं रस्सा वाढला जातो. हा अनुभव अवश्य घ्यावा. मिसळीचा हा काळा मसाला रोजच्या रोज मंगेशच्या घरी पहाटे तयार केला जातो. त्या ताज्या मसाल्यापासून रोजचा रस्सा तयार होतो. त्यामुळे रश्श्याचा रंग, वास आणि लज्जत काही न्यारीच. म्हणूनच इथल्या मिसळीचा बेत केव्हाही जमवून आणा. एकदा हा बेत जमला की तुम्ही पुन्हा पुन्हा जाणार एवढं नक्की.

कुठे आहे साईछाया..

  • टिळक रस्त्यावर हिराबाग चौकातच, स्वारगेटकडे जाताना उजवीकडे, महापालिका क्षेत्रीय कार्यालयाजवळ
  • गेल्या शनिवारी ‘खाऊखुशाल’मध्ये झकास’बद्दल सांगितलं होतं.

कुठे आहे झकास..

  • शनिवार पेठेत. रमणबाग प्रशालेकडून बालगंधर्व रंगमंदिराकडे जाताना रानडे बालक मंदिराजवळ

Story img Loader