vinayak.karmarkar@expressindia.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिसळ, कढी-वडा, कट-वडा, मटार उसळ असे वैविध्यपूर्ण आणि चविष्ट खाद्यपदार्थ मिळणारं अंतुरकर मिसळ स्नॅक्स हे एक नव्यानं सुरू झालेलं हॉटेल. मिसळ थाळीही इथे मिळते.

मिसळीचं नवं हॉटेल सुरू झालं की खवय्यांची पाऊलं आपोआप तिकडे वळतात. अशा नव्या ठिकाणी मग मित्रमंडळींबरोबर मिसळीचा बेत ठरवला जातो आणि नव्या ठिकाणी, नव्या मिसळीचा आस्वाद घेतला जातो. अंतुरकर मिसळ स्नॅक्स या नावानं सुरू झालेल्या हॉटेलमध्ये तुम्हाला हे सगळं सध्या अनुभवायला मिळेल. पुष्कर अंतुरकर यांनी सदाशिव पेठेत अंतुरकर मिसळ स्नॅक्स हे हॉटेल अलीकडेच सुरू केलं आहे. मिसळीबरोबरच इथले अन्यही काही खास पदार्थ खवय्यांच्या पसंतीला उतरले आहेत.

नवीन हॉटेल सुरू करताना पुष्कर यांना मार्गदर्शन मिळाले आहे ते वडील किशोर आणि आई मनीषा यांचे. हे दोघंही हॉटेल आणि केटरिंग तसंच घरगुती मसाले आणि विविध खाद्यपदार्थ तयार करून ते विकण्याच्या व्यवसायात गेली पंचवीस वर्ष आहेत. अंतुरकर यांनी आई-वडिलांच्या प्रेरणेतून हा व्यवसाय सुरू केला. एक हॉटेलही त्यांनी काही वर्ष चालवलं होतं. अंतुरकर यांचा केटरिंगचा व्यवसाय सुरू आहेच, त्यामुळे पुष्कर यांना चवीचा आणि व्यवस्थापनाचा मिळालेला घरगुती वारसा नव्या हॉटेलसाठी उपयुक्त ठरला आहे. त्यांनीही केटरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. बहीण पूर्वा देसाई यांचीही त्यांना मोलाची साथ आहे.

मिसळीबरोबरच आपले मराठी चवीचे खास काही पदार्थ आवर्जून द्यायचे हे पुष्कर यांनी पहिल्यापासूनच निश्चित केलं होतं. त्यामुळे मिसळीला, झणझणीत कट-वडा, वेगळ्या चवीचा कढी-वडा, खास चवीचे दडपे पोहे, मटार उसळ यांची चविष्ट जोड इथे मिळाली आहे. हे सगळेच पदार्थ चवदार आणि त्या त्या पदार्थाची खासियत जपणारे असे आहेत. या शिवाय नाश्त्यासाठी पोहे, उपीट, बटाटेवडा, भजी, शेव चिवडा हेही पदार्थ इथे मिळतात.

मिसळ थाळी हा इथला नवा प्रकार आहे. त्यामुळे ही थाळी अनेक जण घेतात. मिसळीच्या थाळीत इथे मिसळीबरोबरच दोन बटाटे वडे, ताक किंवा मठ्ठा, लाडू असे पदार्थ दिले जातात. मिसळीचा कट हे इथलं वैशिष्टय़ं. त्यासाठीचा मसालाही अंतुरकर यांच्या घरीच तयार केला जातो. विकतचे तयार मसाले वापरायचे नाहीत आणि हॉटेलमध्ये येणाऱ्यांना मिसळीच्या वेगळ्या चवीचा आनंद मिळाला पाहिजे हे निश्चित होतं. त्यामुळे या कटसाठी लागणारा मसाला घरी तयार करून तो दळून आणला जातो. त्यामुळे या कटच्या चवीचं वेगळेपण आणि मिसळीचंही वेगळंपण इथे लगेच जाणवतं. शेव-चिवडा, बटाटा भाजी, चविष्ट कट, कांदा-कोथिंबीर, लिंबू आणि पाव अशी इथली मिसळीची डिश असते. कढी-वडा ही देखील इथली एक वेगळी डिश. घरगुती पद्धतीनं बनवली जाणारी कढी या डिशमध्ये दिली जाते. ही खास चवीची कढी आणि मोठे बटाटेवडे अशी ही डिश आहे. अशाच पद्धतीची कट-वडा ही देखील डिश इथे आहे. मिसळीसाठी वापरला जाणारा कट किंवा र्ती आणि बटाटेवडे असा हा कट-वडय़ाचा थाट असतो. या बरोबरच रोज दुपारी अकरा ते तीन या वेळेत मिळणारी पुणेरी थाळीची चव इथे चाखावी. पोळ्या, सुकी भाजी, रस्सा भाजी, आमटी भात, वरण भात, मसाले भात, जिरा राईस वगैरे भाताचा एक प्रकार असे पदार्थ या पुणेरी थाळीत दिले जातात. उत्तम चवीच्या अनुभवासाठी इथे भेट द्यायलाच हवी.

* कुठे :

१८३०-३१ सदाशिव पेठ, खजिना विहीर रस्ता

* केव्हा :

सकाळी सात ते रात्री साडेआठ

रविवारी दुपापर्यंत

* संपर्क : ९५६१६८५१८६

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous misal thali of anturkar misal and snack