चंद्रमोहन कुलकर्णी (प्रसिद्ध चित्रकार)
‘वाचाल तर वाचाल’ हे वाक्य माझ्यासंदर्भात अगदी तंतोतंत लागू होते. चित्रकार म्हणून कोणत्याही पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार करण्यापूर्वी मी त्या लेखकाने लिहिलेले साहित्य आधी वाचतो. त्यातून विषय उलगडतो आणि चित्र चितारणे सोपे जाते. पण, मी तेवढय़ावरच थांबत नाही. तर, एखाद्या कलाकृतीपेक्षाही तो कलावंत जाणून घेणे माझ्यासाठी महत्त्वाचे ठरते. त्यातून माझ्याची विचारांची जडणघडण झाली. माणूस म्हणून संवेदनशील आणि समृद्ध होण्यास ते पूरक ठरते. त्यामुळेच माझे वाचन अफाट असले, तरी ते विस्कळीत स्वरूपाचे आहे. मात्र, आता मी चित्रकला, शिल्पकला, नृत्य, संगीत या विषयांवरील पुस्तकांच्या वाचनावर भर देण्याचे ठरविले असून चित्रकार म्हणून माझ्यातील कलावंताला न्याय देण्याचे ठरविले आहे. या संदर्भात कोणी मला स्वार्थी म्हटले तरी चालेल.
माझा जन्म पुण्याचाच. शालेय शिक्षणापासून लहानाचा मोठा पुण्यातच झालो. पंचहौद मिशन संस्थेच्या सेंट एडवर्ड बॉइज प्रायमरी स्कूलमध्ये इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. माझे वडील वासुदेव कुलकर्णी हे पोलीस दलात कॉन्स्टेबल असल्याने आम्ही पोलीस वसाहतीमध्येच राहायला होतो. तर, आई सुनंदा ही एक कलावंत होती. ती सुरेख रांगोळ्या आणि चित्र काढीत असे. ती गदिमांची पुस्तके वाचून झाल्यावर मला देत असे. सुधीर फडके-गजाननराव वाटवे यांची गाणी ऐकायची. त्यामुळे मीही संगीताकडे ओढला गेलो. घरखर्चाच्या पैशांतून बचत करीत ती मला राजा परांजपे, राजा गोसावी यांचे चित्रपट दाखवीत असे. कलेचा वारसा मला तिच्याकडूनच मिळाला. आईच्या पोटात असल्यापासूनच मी चित्रकार होणार हे ठरले असावे. त्यामुळेच बालपणापासून मी चित्रे काढत होतो. वडिलांनी माझ्या कलेला प्रोत्साहन दिले. माझा भाऊ आणि दोन बहिणींना ते कपडे आणायचे. पण, माझ्यासाठी रंगीत पेन्सिलचा बॉक्स ते माझ्या उशाखाली ठेवत असत. ‘तुला जे हवे ते प्रामाणिकपणे आणि मन लावून कर. चित्रकार व्हायचे असेल तर ते शिक्षण घे,’ असे सांगून त्यांनी मला प्रेरणा दिली. मी मोठा झालो की नाही हे माहीत नाही. पण, चांगला चित्रकार नक्कीच झालो. नंतर टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमधून अकरावी मॅट्रिक झालो. शाळेत असताना मी अभ्यासात हुशार नव्हतोच. पण, माझी चित्रकला उत्तम असल्याने शिक्षक मला वरच्या वर्गात ढकलत असत. मराठी, हिंदूी, संस्कृत, इंग्रजी या सर्व भाषा उत्तम असल्या, तरी गणित आणि विज्ञानामध्ये कच्चा होतो.
पोलीस वसाहतीमध्ये राहूनही घरातून संस्कार झाल्यामुळे मी हुशार नसलो, तरी चांगला माणूस म्हणून घडलो. अभिनव कला महाविद्यालयातून उपयोजित कलेचा (अॅप्लाइड आर्ट) अभ्यासक्रम पूर्ण केला. डी. एस. खटावकर, मारुती पाटील असे ज्येष्ठ चित्रकार मला शिक्षक होते. सुभाष अवचट सरांनी मला दोन वर्षे शिकविले आहे. चित्रकार रविमुकुल हे माझे समकालीन मित्र. जोशी-अभ्यंकर हत्याकांडातील आरोपी राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, जगताप आणि मुन्वर शहा हे माझ्याच वर्गातील विद्यार्थी. पण, तरीही मी वाईट मार्गाला लागलो नाही. त्या कालखंडात मला रत्नाकर मतकरी, नारायण धारप यांच्या गूढकथा वाचनाची आवड लागली होती. कला अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मी स्वतंत्रपणे काम सुरू केले. आनंद अंतरकर यांनी ‘नवल’, ‘हंस’ मासिकातील कथाचित्र (स्टोरी इलस्ट्रेशन) करण्याची संधी दिली.
‘दक्षता’ मासिकासाठी काम केल्यानंतर मग मी पुस्तकांच्या मुखपृष्ठांसाठी चित्रे करण्याकडे वळालो. रंगनाथ पठारे यांच्या ‘अनुभव विकणे आहे’, डॉ. आनंद यादव यांच्या ‘उखडलेली झाडे’ या पुस्तकासह हजारो पुस्तकांची मुखपृष्ठे मी केली. मुखपृष्ठ करण्यापूर्वी मी ते लेखन वाचतो. त्या लेखकाला समजून घेणे हे मला अधिक महत्त्वाचे वाटते. त्यामुळे मी त्या पुस्तकापुरता सीमित राहत नाही. नुकतीच व्यंकटेश माडगूळकर यांच्या ४२ पुस्तकांची मुखपृष्ठे मी केली. कथा, व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णने, शिकारकथा आणि रेखाटने अशा विविध माध्यमांतून त्यांनी मला समृद्ध केले आहे. एखादी कलाकृती डावी-उजवी असू शकेल. पण, निर्मिती करणारा कलावंत जगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे मी जाणून घेत असतो. त्याचा परिणाम माझ्या घडणीवर आणि चित्रनिर्मितीवर होत असतो.
माझ्याकडे घरी आणि स्टुडिओमधील बुकशेल्फमध्ये पुस्तकांचा खजिना आहे. मध्यंतरीच्या काळात मी काही पुस्तके हुजूरपागा शाळेला, छोटय़ा ग्रंथालयांना आणि काही मित्रांना दिली होती. सध्या मी सरसकट वाचन कमी केले असून केवळ कलाविषयक लेखनाच्या वाचनावर लक्ष केंद्रित केले आहे. चित्रकलेचे विश्व समजून घेण्यासाठी पिकासो वाचला पाहिजे. चित्र, शिल्प, नृत्य, संगीत कलाविषयीचे लेखन वाचनावर भर देणार आहे. मुखपृष्ठांसाठी चित्रे करणे हा व्यवसाय असला, तरी त्यामध्ये फार गुंतून पडणार नाही. तर, सर्जनशीलतेकडे लक्ष देण्यासाठी वाचन करणार आहे. शब्दांपेक्षा चित्रकला श्रेष्ठ आहे. मला व्यक्त होण्यासाठी ही भाषा जास्त ‘एक्सप्रेसिव्ह’ आहे असे वाटते. त्यामुळे ‘शब्द बापुडे केवळ वारा’ अशी माझी माझ्यापुरती समजूत झाली आहे. चित्र ही भाषा माझ्याशी बोलू पाहते आहे. ती समजून घ्यायची असेल, तर मला माझे वाचन कमी केले पाहिजे. अन्य कलावंतांच्या निर्मितीप्रेरणा समजून घेतानाच मला माझी निर्मिती जास्त महत्त्वाची वाटते. अर्थात अफाट वाचन केले नसते, तर मी घडलो नसतो आणि चित्रकार म्हणून उभा राहू शकलो नसतो हेही तितकेच खरे आहे. पत्नी आणि मुलगी मला माझ्या स्वतंत्र कामासाठी मोकळीक देतात.
ईश्वर दिघे यांच्या ‘आइज अॅडव्हर्टायझिंग’ बरोबरच किलरेस्कर न्यूमॅटिक्स आणि टाटा मोटर्सच्या मासिक गृहपत्रिकेसाठी मी काम केले. ‘व्यावसायिक कला (कमर्शियल आर्ट) कलाकाराला खाते,’ असे ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी मला सांगितले होते. हे ध्यानात ठेवून मी सदैव स्वतंत्र काम करीत असतो. दिवसाच्या वेळेचे मी दोन कप्पे केले आहेत. सकाळी व्यावसायिक काम, दुपारनंतर वैयक्तिक कलाविष्कारासाठी वेळ राखून ठेवलेला असतो. दुपारी आणि रात्री दोन तासांचा वेळ वाचनासाठी देतो. माझ्या बुकशेल्फमध्ये अभंगगाथा, ज्ञानेश्वरी, नामदेव गाथा, जी. ए. कुलकर्णी, डॉ. रा. चिं. ढेरे, अरुण कोलटकरांच्या कविता, पिकासो अशी विविध विषयांवरील पुस्तके सुखाने नांदतात. समकालीन वाङ्मयीन प्रवाह मी आवर्जून वाचतो. त्यामुळे माझी चित्र कधी जुनी वाटत नाहीत, असेच मला वाटते.
शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी