पुण्यात तिखट मिसळ किंवा कोल्हापुरी मिसळ खायची म्हटली, की जी नावं आवर्जून घेतली जातात, त्यात टिळक रस्त्यावरच्या ‘रामनाथ’चं नाव घेतलं जातंच. ‘हॉटेल रामनाथ कोल्हापुरी मिसळ’ असं या हॉटेलचं नाव असलं तरी रामनाथची मिसळ या नावानंच ही मिसळ आणि इथे मिळणारे सारे पदार्थ प्रसिद्ध आहेत. थोडी थोडकी नाही तर तब्बल सत्तर वर्षांची परंपरा या हॉटेलला आहे. त्यामुळे येणाऱ्या ग्राहकांची आणि खवय्यांचीही परंपरा या हॉटेलला लाभली आहे. वर्षांनुवर्षे खवय्यांकडून मिळत असलेली पसंती ही रामनाथ मिसळीची खासियत आहे. अर्थात इथल्या चवीचीही परंपरा कायम आहे. त्यामुळेच खवय्यांचीही पसंती लाभली आहे.
मिसळ द्यायची म्हणजे फक्त डिशभर फरसाणवर लाल सँपल घालायचं असा प्रकार या मिसळीच्या बाबतीत नाही. मिसळ आणि सॅम्पल तयार करणं ही देखील एक कला आहे, हे रामनाथ हॉटेल चालवणाऱ्या रणजित खन्ना यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला कळतं. त्यांचे वडील शांतीलाल अनंत खन्ना यांनी रामनाथ हॉटेल अनेक वर्ष चालवलं, नावारूपाला आणलं. खाद्यपदार्थ बनवण्याची जी कला त्यांच्याकडे होती, तीच रणजित यांनीही आत्मसात केली आहे आणि त्यामुळे रामनाथ मिसळीच्या चवीत जराही बदल झालेला नाही. इथली मिसळ बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्यातही सातत्य राखण्यात आलं आहे. त्याच जराही बदल झालेला नाही. मिसळीची ऑर्डर दिल्यानंतर मिसळ भरताना डिशमध्ये आधी पोहे घातले जातात. त्याच्यावर वाटाण्याचा रस्सा. मग त्याच्यावर नायलॉन पोह्य़ांचा चिवडा, नंतर शेव आणि नंतर कांदा घातला जातो. या मिसळीबरोबर सॅम्पलची वाटी आणि ब्रेड वेगळा दिला जातो. लिंबाची फोडही असते. ज्यांना कोल्हापुरी किंवा खूप तिखट मिसळ आवडते, त्यांच्यासाठी इथे र्तीचं सॅम्पल दिलं जातं आणि ज्यांना मध्यम तिखट मिसळ हवी असेल त्यांना फक्त नेहमीचं सॅम्पल दिलं जातं.
हॉटेल व्यवसायातील सर्व धडे शांतिलाल खन्ना यांनी वडिलांकडून घेतले आहेत. अगदी हॉटेलमधील किरकोळ कामांपासून या धडय़ांना प्रारंभ झाला आणि हळूहळू करत सर्व गोष्टी ते शिकले. ग्राहकांना चांगल्या दर्जाचे पदार्थ द्यायचे असतील, तर कच्च्या मालात कुठेही तडजोड करायची नाही, हा इथला शिरस्ता आहे. त्यामुळे वर्षांनुवर्ष इथे ‘प्रकाश’चं तिखटच वापरलं जातं. वडा किंवा भजींसाठी हिरा बेसनचं वापरायचं, मग भले त्याचा दर कितीही होवो. त्यात बदल करायचा नाही, हे ठरूनच गेलेलं आहे. जो माल वापरायचा त्याचे दर वाढले तरी कोणताही पर्याय शोधला जात नाही. मिसळीतील पदार्थासाठी अतिशय दर्जेदार माल वापरला जात असल्यामुळे पदार्थ चविष्ट होतो. शिवाय मिसळीच्या सॅम्पलसाठीचे मसाले देखील इथे कधीही बाहेरून खरेदी केले जात नाहीत. त्यासाठीचा कच्चा माल आणून त्याच्यावर प्रक्रिया करून हॉटेलमध्येच मसाले तयार केले जातात. त्यामुळे चव टिकून राहते आणि ग्राहकांचंही समाधान होतं, असा अनुभव शांतिलाल सांगतात.
हॉटेल रामनाथ जसं मिसळीसाठी प्रसिद्ध आहे तसंच ते इथे मिळणाऱ्या बटाटा वडय़ासाठी आणि भजींसाठी देखील प्रसिद्ध आहे. इथल्या बटाटा वडय़ाची सर्वात लक्षणीय गोष्ट कोणती तर त्याची चव आणि आकार. इथे मिळणाऱ्या वडय़ाच्या आकाराएवढा वडा क्वचितच कुठे बघायला मिळेल. विशेष म्हणजे या वडय़ाच्या चवीत आणि आकारात कित्येक वर्षांत जराही बदल झालेला नाही. जी गोष्ट बटाटा वडय़ाची तीच भजींची देखील. इथली खमंग आणि चविष्ट गोल भजी मिसळीबरोबरच घ्यावीच लागतात. या शिवाय शेव मिसळ, बटाटा भजी, बटाटावडा सॅम्पल, दहिवडा, चहा, कॉफी, दही, ताक, लस्सी यांचाही आस्वाद इथे घेता येतो. ज्यांना तिखट मिसळ आवडते त्यांच्यासाठी हे एक मस्त ठिकाण आहे. पण त्याबरोबरच इथल्या वडय़ाची आणि गोल भजींची चवही घ्यायला हवी. ते विसरू नका.
कुठे आहे..
* टिळक रस्त्यावर, महाराष्ट्र साहित्य परिषदेशेजारी
* सकाळी आठ ते रात्री आठ
सोमवारी बंद