गुरुपौर्णिमेला पूजेची गणेशमूर्ती साकारली
पुणे : शाडू मातीच्या गोळ्यांना सुबक आकार देत नाजूक कोरीवकामासह पावणेदोन तासांमध्ये गणांचा नायक आणि बुद्धीचे दैवत असलेल्या श्री गणरायाची मूर्ती साकारली गेली. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर खटावकर घराण्याच्या तिसऱ्या पिढीचा शुक्रवारी कला क्षेत्रात ‘श्रीगणेशा’ झाला. विपुल खटावकर याने श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी पूजेची मूर्ती साकारली.
ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार डी. एस. खटावकर आणि प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांच्यानंतर कलेचा ‘विपुल’ वारसा लाभलेला या घराण्यातील विपुल याने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांत ही परंपरा पुढे नेणार असल्याचे शुक्रवारी सिद्ध केले. गुरूपौर्णिमाच्या दिवशी तुळशीबाग मंडळाची पूजेची मूर्ती तयार केली जाते. २७ वर्षांच्या विपुल याने साकारलेल्या मूर्तीची कार्यकर्त्यांनी विधिवत पूजा केली आणि यंदाच्या गणेशोत्सव नियोजनाची बैठक झाली. गेली ६० वर्षे ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे.
विपुल खटावकर याने अभिनव कला महाविद्यालयातून फाईन आर्ट विषयामध्ये जी. डी. आर्ट आणि नंतर भारती कला महाविद्यालयात शिल्पकलेमध्ये जी. डी. आर्ट हे शिक्षण पूर्ण केले आहे. यंदाच्या वर्षी तुळशीबाग मंडळाची पूजेची मूर्ती मी करणार असे त्याने सांगितले होते.
गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधून त्याने हा निर्धार साकार केला, असे विवेक खटावकर यांनी सांगितले. ‘आबांची परंपरा मी सुरू ठेवणार असून यापुढे तुळशीबाग मंडळासाठी काम करणार आहे’, असे त्याने मला सांगितले.
पिता म्हणून माझ्यासाठी ही गुरुपौर्णिमा आनंदाचे दान देणारी ठरली, अशी भावना विवेक खटावकर यांनी व्यक्त केली.
असाही योगायोग
तुळशीबाग मंडळाची पूजेची मूर्ती डी. एस. खटावकर करीत असत. पुढे विजय दीक्षित, अशोक ताम्हनकर, मुरली लाहोटी, अरुण पाथरे, रमाकांत कवठेकर, मुकुंद केळकर या खटावकर सरांच्या विद्यार्थ्यांनी ही मूर्ती केली. तुळशीबाग मंडळाची उत्सवातील १४ फूट उंचीची आणि पूजेची मूर्ती १९८८ मध्ये मी साकारली होती. त्या वेळी मी २७ वर्षांचा होतो. आता यंदाच्या वर्षी पूजेची मूर्ती साकारणारा विपुल हादेखील २७ वर्षांचा आहे; हा योगायोगही साधला गेला, असे विवेक खटावकर यांनी सांगितले.