पुणे : किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डाॅ. प्रभा अत्रे यांच्या नावाचा पुरस्कार त्यांच्याच हस्ते स्वीकारला याचा आनंद वाटतो. त्यांच्याप्रमाणेच माझे संपूर्ण जीवन स्वराधीन राहो, हा आशीर्वाद मला द्यावा. हा आशीर्वादच माझा मार्ग प्रशस्त करेल, अशी भावना प्रसिद्ध गायिका कलापिनी कोमकली यांनी रविवारी व्यक्त केली.
गानवर्धन संस्थेतर्फे तात्यासाहेब नातू फाउंडेशनच्या सहकार्याने डाॅ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते कलापिनी कोमकली यांना स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी कोमकली बोलत होत्या. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, फाउंडेशनचे अध्यक्ष शारंग नातू, गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर आणि रवींद्र दुर्वे या वेळी उपस्थित होते. कोमकली म्हणाल्या, या पुरस्कारासंदर्भात दोन वर्षांपूर्वी कृ. गो. धर्माधिकारी काका यांचा फोन आला होता. हा पुरस्कार स्वीकारत असताना ते आपल्यामध्ये नाहीत, ही दु:खाची किनार आहे.
हेही वाचा : पुण्यात शिवशाही बस आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात, सहाजण जखमी, एक गंभीर
अत्रे म्हणाल्या, अभिनंदन, कौतुक, शुभेच्छा यांचा वर्षाव होत असल्याने सध्या मी खूप आनंदात आहे. हे धन माझ्या साधनेची कमाई आहे. मात्र, हे कौतुक पाहायला धर्माधिकारी नाहीत याची खंत वाटते. संगीताच्या माध्यमातून नादाचे विलोभनीय रूप मी अनुभवते आहे. वयाची नव्वदी पूर्ण केली असली तरी अजूनही मला साधनेची वाट दिसत आहे. परंपरेचा मान राखून युवा कलाकारांना परंपरेतील कालबाह्य गोष्टी काढून टाकाव्या लागतील. प्रतिभावान युवा कलाकार हे आव्हान सहजपणे पेलतील आणि विश्वाच्या कला मंचावर भारतीय संगीताचे स्थान अढळ असेल. मुजुमदार आणि राजदत्त यांनी मनोगत व्यक्त केले. घोटकर यांनी प्रास्ताविक केले. सविता हर्षे यांनी सूत्रसंचालन केले.