युवा पिढीला गुलाम करण्यासाठी धर्माध शक्तींकडून सणांचा वापर केला जात असल्याची टीका रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. मोठय़ा रकमेच्या पारितोषिकाचे आमिष दाखविल्याने दहीहंडी फोडताना मृत्युमुखी पडलेले आणि गंभीर जखमी झालेले युवक हे दलित, कष्टकरी आणि बहुजन समाजाचे असल्याचा दावा करीत या दहीहंडीचे आयोजन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
आसाराम बापू यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. पण, लैंगिक शोषणासारखे गंभीर प्रकरण होऊनही वेगवेगळी कारणे देऊन त्यांची अटक टाळली गेली. सरकार धर्माध शक्तींना प्रोत्साहन देत असल्याचेच हे द्योतक आहे, याकडे लक्ष वेधून आंबेडकर म्हणाले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन ११ दिवस उलटल्यानंतरही मारेक ऱ्यांचा शोध लागत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अशा पद्धतीने नरबळी दिल्यावरच जादूटोणाविरोधी विधेयक संमत व्हावे ही राज्यासाठी नामुष्कीची बाब आहे. धर्माध शक्तीकडे वळणारे युवक दाभोलकर यांच्या कार्यामुळे विवेकवादाकडे आकर्षित होत असताना सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुरक्षा का दिली गेली नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलीस अजूनही काळोखात चाचपडत असून दाभोलकर यांच्या मारेक ऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
सत्तेमध्ये असलेल्या मराठा राज्यकर्त्यांनीच मराठा समाजाला उपेक्षित ठेवले. त्यामुळे आता आरक्षण दिले, तरी शैक्षणिक क्षेत्राचा अपवाद वगळता मराठा समाजाला फारसा लाभ होईल अशी शक्यता नाही. खासगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आरक्षणाची हवाच काढून घेतली असल्याने आरक्षणामुळे फायदा किती होईल हा प्रश्नच आहे, असे सांगून आंबेडकर म्हणाले, इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा काढण्यात आली आहे. २१ व्या शतकाला साजेसे स्मारक सरकार करणार असेल, तर घाई करण्यापेक्षाही सरकारला पाठिंबा देणे योग्य ठरेल.
युवा पिढीला गुलाम करण्यासाठी धर्माध शक्तींकडून सणांचा वापर – आनंदराज आंबेडकर
युवा पिढीला गुलाम करण्यासाठी धर्माध शक्तींकडून सणांचा वापर केला जात असल्याची टीका रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
आणखी वाचा
First published on: 02-09-2013 at 02:42 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fanatical power use youth for festivals anandraj ambedkar