पिंपरी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांना सर्वपक्षीय सदस्यांनी, तसेच अधिकाऱ्यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून ‘निरोप’ दिला. वेगवेगळ्या मुद्दय़ांवरून आयुक्तांवर टीका करणाऱ्या नगरसेवकांनीही ‘जाता-जाता’ त्यांच्या कार्यपद्धतीचे भरभरून कौतुक केले. महापालिकेतील पहिलाच अनुभव खूपच सुखद ठरल्याचे सांगत, प्रत्येक आयएएस अधिकाऱ्याने एकदा तरी महापालिकेत काम करावे, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.
पिंपरी महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक व अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे जाधव यांना निरोप दिला. ‘सिट्रस’ येथे झालेल्या या समारंभात महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, पक्षनेत्या मंगला कदम, माजी महापौर आर. एस. कुमार, योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, राजू मिसाळ, सुलभा उबाळे, सुरेश म्हेत्रे, प्रशांत शितोळे आदींसह मोठय़ा संख्येने नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात बोलताना सर्वच नगरसेवकांनी आयुक्तांच्या कार्यपद्धतीची प्रशंसा केली, त्यात त्यांच्यावर टीका करणाऱ्या नगरसेवकांचाही समावेश होता. या वेळी त्यांना काही भेटवस्तू आठवण म्हणून देण्यात आल्या. मनोगत व्यक्त करताना आयुक्तांनी सर्वाचे आभार मानले. महापालिकेत काम करण्याचा पिंपरीत पहिलाच अनुभव होता. ‘‘पालिकेत जाऊ नको, असा सल्ला अनेकांनी दिला होता. मात्र, सव्वा दोन वर्षांच्या कामकाजानंतर, प्रत्येक आयएएस अधिकाऱ्याने एकदा तरी महापालिकेत काम केले पाहिजे, असे आपले मत बनले,’’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. या वेळी श्रीनिवास पाटील, दिलीप बंड, आशिष शर्मा, गणेश ठाकूर आदी माजी आयुक्तांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

Story img Loader