लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : कामावर न आल्याने शेतमजुरावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना खडकवासला धरण परिसरातील मांडवी बुद्रुक गावात नुकतीच घडली. मजुरावर कोयत्याने वार करण्यात आल्यानंतर त्याची पत्नी त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन निघाली होती. त्यावेळी शेतमजूर दाम्पत्याला आरोपीने मोटारीने धडक दिली. अपघातात शेतमजूर आणि त्याची पत्नी जखमी झाली. उपचारादरम्यान मजुराचा मृत्यू झाला असून, त्याच्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भरत लक्ष्मण वाल्हेकर (वय ५५, सध्या रा. मांडवी बुद्रुक, ता. हवेली, मूळ रा. रोहा, जि. रायगड) असे खून झालेल्या मजुराचे नावअआहे. याप्रकरणी हवेली पोलिसांनी संजय हिंदुराव पायगुडे (वय ५०, रा. मांडवी बुद्रुक, ता. हवेली) याला अटक केली असून, सचिन नथू पायगुडे (वय ४५) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा-पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या दोघांना भरधाव कारने उडवलं; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, एक गंभीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकर दाम्पत्य विलास दिनकर पायगुडे यांच्या शेतात कामाल होते. पायगुडे यांच्या खोलीत ते राहत होते. आरोपी सचिन विलास पायगुडेचा पुतण्या आहे. वाल्हेकर दाम्पत्य मूळचे रायगड जिल्ह्यातील रोहा गावचे रहिवासी आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ते गावात वास्तव्यास आहेत. वा्ल्हेकर गावातील अन्य शेतकऱ्यांकडे काम करत होते. पायगुडे यांच्या शेतावर ते तीन ते चार दिवस कामाला आले नव्हते. बुधवारी (३ जुलै) ते दुसऱ्या एका शेतकऱ्याकडे कामाला निघाले होते. आरोपी सचिनने वाल्हेकर दाम्पत्याशी वाद घालण्यास सुुरुवात केली. सचिनने भरत वाल्हेकर यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्याने भरत यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यावेळी भरत यांची पत्नी अनुसयाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कोयत्याचा दांड्याने अनुसया यांना मारहाण करण्यात आली. या घटनेत भरत गंभीर जखमी झाले.

आणखी वाचा-राज्यातील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची भरती?

गंभीर जखमी झालेल्या भरत यांना घेऊन त्यांची पत्नी अनुसया बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रुग्णालयात उपचारासाठी घेऊन निघाली होती. त्यावेळी आरोपी सचिन मोटारीतून आला. त्याच्याबरोबर आरोपी संजय पायगुडे होता. मोटारचालक आरोपी सचिनने वाल्हेकर दाम्पत्याला धडक दिली. ग्रामस्थांनी जखमी अवस्थेतील वाल्हेकर दाम्पत्याला ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच भरत यांचा मृत्यू झाला. भरत यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्यात आला होता. ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती हवेली पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अनुसया यांचा जबाब नोंदवून घेतला. तेव्हा पायगुडेने कोयत्याने वार केले, तसेच मोटारीची धडक दिली, असे अनुसया यांनी पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपी संजय पायगुडेला अटक करण्यात आली असून, साथीदार सचिनचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farm labourer was stabbed to death for not coming to work pune print news rbk 25 mrj
Show comments