लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : आजारपणाला कंटाळून शेतकऱ्याने पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडी भागात घडली.
बाळासाहेब निवृत्ती कुंजीर (वय ६१) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. कुंजीर यांच्याकडे शस्त्र परवाना होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसरा, बाळासाहेब कुंजीर आणि कुटुंबीय पुणे-सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडीत राहायला आहेत. कुंजीर यांना मधुमेहाचा त्रास होता. चार वर्षांपूर्वी त्यांना करोना संसर्ग झाला होता. करोना संसर्गात त्यांचा एक डोळा निकामी झाला होता. डोळा निकामी झाल्याने ते घरात असायचे. त्यांच्या हालचालीवर मर्यादा यायच्या. कुंजीर यांच्या नात्यातील एकाच्या घरी शुक्रवारी कार्यक्रम होता. कुंजीर कुटुंबीय कार्यक्रमासाठी गेले होते. कुंजीर घरात एकटे होते. त्यांनी पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून घेतली. कुंजीर कुटुंबीय घरी परतल्यानंतर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.
कुंजीर यांच्या मुलाने या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. कुंजीर यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. आजारपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत मिळाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.