पिंपरी : जमीन व्यवहारातील ठरलेली तीन कोटी १० लाख रूपयांची रक्कम न देता विकसकाने फसवणूक केल्याची तक्रार नेरे येथील शेतकऱ्याने हिंजवडी पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांताराम दत्तात्रय कुदळे (वय-६१, व्यवसाय-शेती, रा. गणेशनगर, नेरे) यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी साईरंग डेव्हलपर्सचे मालक के. आर. मलिक, मोहम्मह बीन शाहरूख व मलिक यांचा मुलगा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हेही वाचा <<<मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी; दोन ठिकाणी भिंत कोसळण्याच्या घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरे दत्तवाडी येथे सर्व्हे क्रमांक ६७ येथे फिर्यादींची एक हेक्टरहून अधिक जागा आहे. ती जागा साईरंग डेव्हलपर्सने खरेदी केली. त्या मोबदल्यात जमीन मालकास १ कोटी ६० लाख रूपये दिले. उर्वरित ३ कोटी १० लाख रूपये दिले नाहीत. याबाबतचा धनादेश दिला. मात्र, तो वटला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार शेतकऱ्याने हिंजवडी पोलिसांकडे केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक देशमुख पुढील तपास करत आहेत.