पुणे : कसण्यासाठी दिलेल्या जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना खडकवासला परिसरातील सांगरुण गावात घडली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध उत्तमनगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नारायण उर्फ नाना पांडुरंग मानकर (वय ७३, रा. रुपरेखा बंगला, लोकेश सोसायटी, बिबवेवाडी) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सतीश विठ्ठल खडके (वय ३५, रा. सांगरुण, ता. हवेली) याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नारायण मानकर यांचा मुलगा नीरज (वय ४३) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण मानकर मूळचे खडकवासला परिसरात सांगरुण गावातील आहेत. त्यांनी आरोपी सतीश खडके याला सांगरुण गावातील जमीन कसण्यासाठी दिली होती. शुक्रवारी सकाळी आरोपी खडके हा मानकर यांना मोटारीतून घेऊन सांगरुण गावात आला. दिवसभर त्यांनी शेतातील कामे केली. त्यानंतर खडकेने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. नारायण यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने खडके आणि साथीदारांनी वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात मानकर यांचा जागीच मृत्यू झाला.
आरोपींनी नथू मानकर यांच्या जागेत लावलेल्या मोटारीत नारायण मानकर यांचा मृतदेह ठेवला. त्यानंतर खडके आणि त्याच्याबरोबर असलेले साथीदार पसार झाले. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत वडील घरी न परतल्याने मानकर यांचा मुलगा नीरज याने विचारपूस केली. शनिवारी सकाळी सांगरुण गावातील नथू मानकर यांच्या जागेत लावलेल्या मोटारीत नारायण यांचा मृतदेह सापडल्याची माहिती मानकर यांच्या नातेवाईकांना मिळाली. नारायण मानकर यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यांच्या गळ्यातील दोन सोन्याचे गोफ, अंगठी असा १९ तोळ्यांचा ऐवज चोरून आरोपी खडके आणि साथीदार पसार झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या घटनेची माहिती उत्तमनगर पोलिसांना कळविण्यात आली. परिमंडळ तीनचे पाेलीस उपायुक्त संभाजी कदम, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेले आरोपी खडके आणि साथीदारांचा शोध घेण्यात येत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे तपास करत आहेत.